जी-२० राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्याकडे जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. आपल्यातील संभाषणाची माहिती बाहेर उघड झाल्याने जिनपिंग यांनी जस्टीन ट्रूडो यांना सर्वांसमोर सुनावलं. यानंतर ट्रूडो यांनीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सर्वांसमोर झालेल्या या शाब्दिक वादामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दोघांमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत जिनपिंग आपल्यातील संभाषणाची माहिती पेपरकडे लीक झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. “ही योग्य पद्धत नाही आणि अशा पद्धतीने चर्चा आयोजित केली जाऊ शकत नाही,” असं जिनपिंग कॅनडाच्या पंतप्रधानांना सांगताना दिसत आहेत.
हे युद्धाचे युग नाही!; जी-२० जाहीरनाम्यात नरेंद्र मोदींच्या विधानाचा पुनरुच्चार
यावर जस्टीन ट्रूडो यांनीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. “कॅनडात आम्ही मुक्त आणि स्पष्ट संवादावर विश्वास ठेवत असून यापुढेही तेच चालू ठेवू. आपण यापुढेही रचनात्मकपणे एकत्रित काम करु. पण आपण असहमत असू असे अनेक मुद्दे असतील,” असं ते स्पष्टपणे म्हणाले.
राष्ट्रपती जो बायडेन यांचा पंतप्रधान मोदींना ‘सॅल्यूट’; मोदींनीही दिला प्रतिसाद
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच चर्चा झाली. इंडोनेशियामधील बाली येथे जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही जागतिक नेत्यांमध्ये ही चर्चा झाली.
१० मिनिटांच्या या चर्चेदरम्यान जस्टीन ट्रूडो यांनी चीनकडून देशांतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. कॅनडा सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.
जस्टीन ट्रूडो आणि क्षी जिनपिंग यांच्यात यावेळी रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला, उत्तर कोरिया आणि मॉन्ट्रियल येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेसंबधी चर्चा केली. या परिषदेत ‘निसर्गाचे रक्षण आणि हवामान बदलाशी लढा’ यावर चर्चा होणार आहे.