नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपली स्वायत्तता आणि आर्थिक संबंध जपत असताना नव्या जगाची घडी बसविण्याच्या दिशेने भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काढले. जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ‘एक्स्प्रेस समूहा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी भविष्याबाबत महत्त्वाचा इशाराही दिला. ‘भवितव्याबाबतचिंतेपेक्षा मला आशा अधिक असली तरी त्यासाठी देशातील सामाजिक सौदार्ह जपणे महत्त्वाचे आहे,’ असे ते म्हणाले.
हेही वाचा >>> संयुक्त घोषणापत्रासाठी शेर्पाची धावपळच युक्रेन युद्धावरून मतभेदाचा अडसर
२००८ साली जी-२०ची स्थापना झाली, त्यावेळी डॉ. सिंग देशाचे पंतप्रधान होते. २०१४ पर्यंत त्यांनीच या राष्ट्रगटात देशाचे प्रतिनिधित्व केले. ‘एक्स्प्रेस समुहा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जी-२० अध्यक्षपदारून भारताची कामगिरी, शिखर परिषदेचे आयोजन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची भूमिका आदी मुद्दय़ांवर मनमोकळे भाष्य केले. ‘‘आपल्या हयातीमध्ये भारताकडे चक्राकार पद्धतीचे जी-२० अध्यक्षपद आले आणि शिखर परिषदेचे यजमानपद भारत करत असल्याचे बघायला मिळाले, याचे समाधान आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि पाश्चिमात्य देश-चीनमधील तणावामुळे जागतिक परिस्थिती बरीच बदलली आहे. अशा वेळी स्वातंत्र्यापासून टिकलेली शांतताप्रीय लोकशाही आणि वर्धमान अर्थव्यवस्थेमुळे देशाने जगात प्रचंड आदर कमावला आहे,’’ असे सिंग म्हणाले. जेव्हा दोन मोठय़ा देशांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा इतरांवर कुणा एकाची बाजू घेण्याचे दडपण असते. सध्या भारताने आपले सार्वभौमत्व व आर्थिक हितसंबंध जोपासतानाच शांततेचे आवाहन करण्याची भारताची भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>> पर्यावरण, शाश्वत विकासावर भर; दिल्लीमध्ये उद्यापासून दोन दिवसांची बैठक, भारताची जय्यत तयारी
चीनबरोबर ताणले गेलेले संबंध आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची जी-२० परिषदेतील अनुपस्थिती याबाबत विचारले असता सिंग म्हणाले, की गुंतागुंतीचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे हाताळावेत यावर मी पंतप्रधानांना सल्ला देणे योग्य नाही. मात्र जिनपिंग जी-२० परिषदेला न येणे दुर्दैवी आहे. देशाच्या सीमा आणि स्वायत्ततेचे रक्षण करून तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान योग्य पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.
केंद्र सरकारच्या रचनेमध्ये परराष्ट्र धोरण हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. जगातील भारताचे स्थान, हा देशांतर्गत राजकारणाचा मुद्दा निश्चितच आहे. मात्र मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र राजकारणाचा पक्ष किंवा व्यक्तिगत राजकारणासाठी वापर करण्यापासून आपण दूर राहिले पाहिजे.
– डॉ. मनमोहन सिंग</strong>, माजी पंतप्रधान