वाढदिवस वा काही सेलिब्रेशन करताना तलवारीने केक कापल्याचं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं आपण ऐकलं असेलच. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडीओ आहे, इंग्लडच्या राणीचा! जी-७ राष्ट्रांची शिखर परिषद सुरू असून, या दरम्यान एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इंग्लडच्या राणीच्या हस्ते केक कापण्यात आला. केक कापण्यासाठी चाकू असतानाही राणीने तलवारीने केक कापला. हा व्हिडीओवर नेटकरीही प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान या राष्ट्रांचा सहभाग असलेली जी-७ परिषद सुरू आहे. नैर्ऋत्य इंग्लंडमध्ये तीन दिवसांची ही परिषद चालणार असून, या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ‘द डचेस ऑफ कॉर्नवाल’ लोकांनी एकत्र यावं, सोबत जेवण करावं आणि मित्रत्वाचे संबंध दृढ करावे, अशा उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

Queen Elizabeth Cuts Cake With Sword
जेव्हा टेबलवर चाकू असल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी मला माहिती आहे, असं म्हणत तलवारीनेच केक कापला. (Photo credit : The Prince of Wales and The Duchess of Cornwall)

हेही वाचा- ‘जी ७’द्वारे चीनला शह; जागतिक पायाभूत योजनेचे अमेरिकेकडून सूतोवाच

या कार्यक्रमाला इंग्लडची राणी एलिझाबेथ यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. करोना काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी केलेल्या कामाबद्दल राणी एलिझाबेथ यांनी आभार सुद्धा मानले. यावेळी त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. ज्यावेळी राणी एलिझाबेथ यांना केक कापण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकाकडून तलवार घेतली. केक कापण्यासाठी चाकू असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. मात्र, राणीने तलवारीनेच केक कापला.

हा सगळा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जेव्हा टेबल चाकू असल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी मला माहिती आहे, असं म्हणत तलवारीनेच केक कापला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत.

Story img Loader