फ्रान्सला सर्वाधिक तरुण पंतप्रधान लाभले आहेत. ३४ वर्षीय गॅब्रिअल अटल यांना देशाचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ही घोषणा केली. तसंच, गॅब्रिएल हे फ्रान्समधील सर्वात पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत.
गॅब्रिअल अटल हे सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये त्यांचंही नाव अग्रणी होतं. तसंच, जनमत सर्वेक्षणानुसार ते देशातील सर्वात लोकप्रिय राजकारणांपैकी एक आहेत. पंतप्रधानपदी गॅब्रिअल यांची नियुक्ती करताना राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “मला माहित आहे की मी तुमची उर्जा आणि तुमच्या वचनबद्धतेवर मी विश्वास ठेवू शकतो.”
२०२३ मध्ये पेन्शन आणि इमिग्रेशन सुधारणांमुळे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यापुढील आव्हान वाढले होते. तसंच, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे माजी पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान पदाचा सोमवारी राजीनामा दिला. फ्रेंच राजकीय व्यवस्थेनुसार, पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्राध्यक्षाद्वारे केली जाते आणि ते संसदेला जबाबदार असतात. देशांतर्गत धोरणाची अंमलबजावणी, विशेषत: आर्थिक उपाययोजना आणि सरकारच्या मंत्र्यांच्या टीममध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी अटल यांच्याकडे असेल.
कोण आहेत गॅब्रिअल?
कोविड-१९ च्या काळात गॅब्रिअल प्रसिद्धीझोतात आले. याकाळात त्यांनी देशासाठी प्रचंड काम केलं. करोनाकाळातील त्यांचं कार्य सर्वश्रूत झाल्याने त्यांचं प्रचंड कौतुकही झालं. वयाच्या ३४ व्या वर्षीही त्यांचं देशातील राजकारणात चांगलं योगदान आहे. ते १७ वर्षांचे असताना समाजवादी पक्षात सामील झाले. २०२३ मध्ये शिक्षण मंत्री बनण्यापूर्वी ते अर्थशास्त्र आणि वित्त मंत्रालयात मंत्री होते.
डाव्या विचारसरणीचे असणारे अटल यांनी शिक्षणमंत्री म्हणून राज्याच्या शाळांमध्ये मुस्लिम अबाया ड्रेसवर बंदी घातली. त्यामुळे ते पुराणमतवाद्यांमध्ये लोकप्रिय झाले. २०१८ मध्ये एका जुन्या शालेय सहकाऱ्याने गॅब्रिएल यांच्याशी अपमानास्पद वर्तवणूक केली होती. ते त्यावेळी मॅक्रॉनचे माजी राजकीय सल्लागार स्टीफन सेजॉर्नशी नात्यात होता.