दिवंगत केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे देण्यात आले आहेत. मुंडेंच्या अपघाताबाबत केंद्राने सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली होती. मुंडे यांचा ३ जून रोजी दिल्लीत अपघाती मृत्यू झाला होता.
मुंडे हे केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या दिमतीला एकही सुरक्षा कर्मचारी (गार्ड) का नव्हता? इथे आमदाराबरोबरही गार्ड असतो. अपघातानंतर आठच मिनिटांत मृत कसे घोषित केले? सुरुवातीला अपघाताच्या धक्क्याबरोबर हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका नसून यकृतात रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातात डाव्या बाजूला धडक बसली, तर मुंडे आडवे पडायला पाहिजेत. समोरच्या बाजूला चेहऱ्यावर लागलेला मार कसा? ज्या चौकात गाडीचा अपघात झाला तो ‘वन-वे’ आहे. मग इंडिका त्यांच्या दिशेने कशी आली? मुंडे सकाळी घरातून निघाले, तेव्हा त्यांच्याबरोबर आणखी कोण होते? ते किती वाजता निघाले? रस्त्यात कोणाला भेटले? या बाबत तपशील कोणीच सांगायला तयार नाही.
गोपीनाथ मुंडे यांच्यावर परळी येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनीसुध्दा जनमताचा आदर करत अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा