दिग्विजय सिंह यांचा आरोप; गडकरींकडून मात्र इन्कार
जम्मू-काश्मीरमधील जोजिला बोगद्याच्या निर्मितीचे सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळालेल्या आयआरबी कंपनीशी  केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी केला आहे. आर्थिक हितसंबंध असल्याने गडकरी यांनी बोगदानिर्मितीचा कोणताही अनुभव गाठीशी नसलेल्या आयआरबीला कंत्राट दिले. केवळ आयआरबीनेच या विकासकामासाठी निविदा दाखल केली होती व त्यांनाच हे काम मिळाले, यावर दिग्विजय सिंह यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जोजिला बोगद्याच्या विकासकामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटत उद्घाटन झाले होते. दिग्विजयसिंह यांनी गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गडकरी यांनी मात्र सारे आरोप फेटाळले. कंत्राट वितरणाची सारी प्रक्रिया ऑनलाइन असून आयआरबीशी स्वत:चा अथवा कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, अशा शब्दांत गडकरी यांनी दिग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिले.
दिग्विजय सिंह यांनी थेट गडकरी यांच्यावर आरोप केला असला तरी काँग्रेसमधून यावर कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दिग्विजय  सिंह यांनी या प्रकरणाची तक्रार केंद्रीय दक्षता आयोगाकडे केली आहे. आयोगाचे अध्यक्ष के. व्ही. चौधरी यांना दिग्विजय सिंह यांनी पत्र पाठवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकल्प नेमका काय ?
हिवाळ्यात मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्याने जम्मू-कश्मीरचा (राष्ट्रीय महामार्ग क्र. १) देशाशी संपर्क तुटत असे. यावर मात करण्यासाठी १४.८ किलोमीटर लांबीचा जोजिला बोगदा निर्माण करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते व परिवहन खात्याने घेतला. त्यासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयआरबीला हे कंत्राट देण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत १० हजार ५० कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadkari give rs 10000 crore contract to irb says digvijay singh