भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पक्षाची अडचण आणि बदनामी टाळण्यासाठी आपले अध्यक्षपद किंवा उद्योग यापैकी एकाची निवड करावी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस. गुरुमूर्ती यांनी ‘ट्विटर’ वरून मंगळवारी सूचित केले. विशेष म्हणजे गडकरी यांच्या उद्योग व्यवसायांमधील कथित गैरव्यवहारांबद्दल गुरुमूर्ती यांनी गेल्याच आठवडय़ात त्यांना कायदेशीर आणि नैतिकदृष्टय़ाही ‘क्लीन चिट’ दिली होती. असे असताना गुरुमूर्ती यांनी मंगळवारी गडकरींसंदर्भात मतप्रदर्शन केल्यामुळे गडकरी यांच्या अडचणींत भर पडली आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रमुखाने उद्योगात राहू नये, असे आपले मत आहे. कारण तसे झाल्यास पक्षाला नेहमीच समस्यांना सामोरे जावे लागते, पक्षाबद्दल चर्चा सुरू होते, असे आपल्याला वाटत असल्याचे गुरुमूर्ती यांनी नमूद केले. गडकरी पक्षाध्यक्षपदी राहतात किंवा नाही, याची मला फारशी फिकीर नाही, असे स्पष्ट करतानाच गडकरी यांच्या कथित गैरव्यवहारांचे ऑडिट सद्भावनेपोटी केले होते, असेही गुरुमूर्ती यांनी स्पष्ट केले.
गडकरी यांच्याप्रती विश्वास दर्शविण्यासाठी भाजपने गेल्याच आठवडय़ात गुरुमूर्ती यांच्या चौकशी अहवालाचा आधार घेतला होता. मात्र, गडकरी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळले नसल्याचे गुरुमूर्ती स्पष्ट केले आहे. तरी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्याविरोधात झालेले आरोप म्हणजे राजकीय समस्या असून, त्याचा प्रतिवाद भाजप आणि गडकरी यांनीच करणे आवश्यक असून, आपण केवळ वस्तुस्थितीची चिकित्सा केली,  गडकरी यांच्यावर प्रसारमाध्यमांमधून करण्यात आलेले आरोप खोटे असून त्याला आपण ‘क्लीन चिट’ दिली असे वाटत असेल तर तसे समजावे,असे त्यांनी नमूद केले आहे.     

Story img Loader