पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना ‘मिशन गगनयान’ या मोहिमेची घोषणा केली. गगनयान मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदा स्वबळावर आपला अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. २०२२ पर्यंत किंवा त्याआधी ही मोहिम यशस्वी करण्याचे लक्ष्य इस्त्रोने समोर ठेवले आहे. फक्त भारतीय अंतराळवीराला स्वबळावर अवकाशात घेऊन जाणे एवढेच या मोहिमेच उद्दिष्टय नाहीय तर या मोहिमेतून १५ नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले.

२०२२ किंवा त्याआधी भारताचा मुलगा किंवा मुलगी तिरंगा झेंडा हाती घेऊन अवकाशात जाईल असे मोदी या मोहिमेची घोषणा करताना म्हणाले होते. या मानवी अवकाश मोहिमेमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. जवळपास १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल असे इस्त्रोचे अध्यत्र के. शिवन म्हणाले. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने चांद्रयान-१, मंगळयान या यशस्वी मोहिमांनंतर भारतीय अंतराळवीराला अवकाशात घेऊन जाण्याची महत्वकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.

भारताची ही मोहिम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर मानवी अवकाश मोहिम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.

काय म्हणाले इस्त्रोचे अध्यक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ७२ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना ‘मिशन गगनयान’ची महत्वपूर्ण घोषणा केली. मोदींच्या या घोषणेला भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जो शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २०२२ पर्यंत भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी अवकाश संस्था पूर्णपणे सक्षम आहे असे इस्त्रोचे अध्यक्ष आणि वैज्ञानिक के.शिवन यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला २०२२ पर्यंतचे लक्ष्य दिले आहे. ठरवून दिलेल्या वेळेत लक्ष्य पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे.

आम्ही आधीपासूनच या मोहिमेची तयारी करत आहोत. क्रू मॉडयुल आणि अन्य तांत्रिक बाबींचे काम पूर्ण केले आहे. आता आम्हाला प्राथमिकता निश्चित करुन लक्ष्य गाठावे लागेल असे इस्त्रोचे अध्यक्ष के.शिवन यांनी सांगितले. या मोहिमेसाठी मोठे रॉकेट आणि अंतराळवीराचे प्रशिक्षण ही दोन मुख्य आव्हाने इस्त्रोसमोर आहेत. २०२२ ची मुदत कठिण असली तरी आमच्यामध्ये मोहिम यशस्वी करण्याची क्षमता आहे असे वैज्ञानिक तुषार जाधव यांनी सांगितले.