चांद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाण आणि लॅण्डिगनंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयान मोहिमेच्या व्हिकल टेस्ट फ्लाईटचं आज पहिलं परिक्षण (चाचणी उड्डाण) केलं जाणार आहे. गगयान मिशनचं चाचणी उड्डाण टीव्ही डी १ आज सकाळी लॉन्च केलं जाणार आहे. इस्रोने मानवासहित ही योजना आखली असून क्रू मॉडेलला सुरक्षितरित्या उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे.
आजचा दिवस महत्त्वाचा
गगनयान मोहिमेत ३ सदस्यांची टीम ३ दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या ४०० किमी वरच्या कक्षेत पाठवलं जाणार आहे. हे क्रु मॉडेल समुद्रात सुरक्षितपणे उतरवले जाईल. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असं करणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. त्यामुळे आजचा क्षण भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.
कुठे पाहाल प्रक्षेपण?
या चाचणीला पुढील काहीच मिनिटांत सुरुवात होणार आहे. https://facebook.com/ISRO आणि https://youtube.com/watch व्यतिरिक्त ISRO वेबसाइट http://isro.gov.in येथे तुम्ही गगनयान मोहिमेचं थेट प्रक्षेपण पाहु शकणार आहात.
काय आहे गगनयान मोहीम ?
गगनयान प्रकल्प, मानवयुक्त अंतराळ मोहिमा पाठविण्याची भारताची क्षमता दाखवत आहे. आत्तापर्यंत भारतासह विविध देशांच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केली. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या–प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवलेले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तीत बसेल. म्हणजेच भारत स्वबळावर देशाच्या नागरिकांना अवकाशात पाठवणार असून या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं. गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक रॉकेट सज्ज आहे, तर अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत, त्या क्रू मॉडेलच्या प्रत्यक्ष चाचण्या घेण्यात येणार आहेत.
इस्रोने सांगितल्यानुसार, “गगनयान मोहिमेसाठी अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहेत. या यानामधून अंतराळवीरांना सुरक्षित नेणे-आणणे हे महत्त्वाचे आहे. प्रक्षेपण, ‘क्रू’ला जीवनावश्यक सुविधा, संकटकालीन सुविधा, अंतराळात जाण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण, व्यवस्थापन अशा अनेक घटकांचा विचार तंत्रज्ञान निर्मितीवेळी केलेला आहे.