पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन  सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे एफटीआयआय या संस्थेच्या संचालक मंडळाची फेररचना करण्यात आली असून अभिनेत्री विद्या बालन, निर्माते राजू हिरानी व जहनू बरूआ तसेच छायालेखक संतोष सिवन यांना सदस्यपदी नेमण्यात आले आहे. अभिनेते गजेंद्र चौहान यांनी महाभारत मालिकेत युद्धिष्ठिराची भूमिका बजावली होती. त्यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही घोषणा केली. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
सदस्य मंडळावर अभिनेत्री पल्लवी जोशी, आसामी अभिनेता प्रांजल सैकिया, नाटककार  ऊर्मिल थापलियाल, नरेंद्र पाठक, वृत्तपट निर्मात्या अनघा घैसास व अभिनेते राहुल सोलापूरकर यांचीही नेमणूक केली आहे. माजी विद्यार्थी गटात सिवन, हिरानी, शैलेश गुप्ता व इमोसिंह यांची नेमणूक झाली आहे. अकार्यकारी सदस्यात माहिती व प्रसारण सहसचिव, प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माहिती व प्रसारण खात्याचे अतिरिक्त सचिव व आर्थिक सल्लागार, चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय चित्रपट निर्मिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, फिल्म डिव्हिजनचे महासंचालक, आयआयएमसीचे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया, सत्यजित राय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट या संस्थांचे संचालक  यांचा समावेश आहे. तज्ज्ञ गटात श्रावण कुमार, चैतन्य प्रसाद, शशी प्रकाश गोयल यांचा समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader