देश-परदेशांत मनसोक्त भ्रमण करूनही चारधाम यात्रेची मोहिनी मनावर होतीच. पण ही यात्रा खडतर आहे हे सर्वाकडून ऐकल्यामुळे ती करण्याची हिंमत काही होत नव्हती. पण भोपर (डोंबिवली) इथल्या मयूरेश्वर मंदिराच्या प्रमुख गणेश योगिनी सौ. संध्याताई अमृते यांनी आदेश दिला आणि चारधाम यात्रेचं प्रस्थान ठेवलं. पहिला सर्वात कठीण धाम यमनोत्री. रस्ता अवघा सहा किलोमीटरचा. पण चढण अत्यंत कठीण. दुर्गम. रस्ता लहान व त्यावर घोडे, दंडी, कंडी आणि पायी चालणारे यात्रेकरू यांची तुफान गर्दी. दर्शनासाठी इच्छुक आणि दर्शन घेऊन परतणारे यात्रिक त्या अरुंद रस्त्यावर एवढय़ा प्रमाणात की तासन्तास त्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम! मी स्वत: पालखी (दंडी)चा पर्याय निवडलेला. पालखीतून पाच तासांनी उतरल्यावर पाठीच्या कण्याने पूर्ण बंड पुकारलं. उभं राहाणंही अशक्य झालं. यात्रा पूर्ण करण्याचा निर्धार केला.
यमनोत्रीचा अवघड धाम पार पडला. गंगोत्रीचं दर्शन झालं. केदारनाथकडे प्रस्थान ठेवलं. हा तर १४ कि.मी. अत्यंत अवघड प्रवास. पुन्हा पालखीचा पर्याय. पण अत्यंत प्रेमळ गढवाली पालखीवाहक मुलांमुळे हाही प्रवास सुखरूप पार पडला. एव्हाना चारधाम यात्रेतले तीन अवघड धाम घडले होते. आता चारच दिवसांत ही अवघड यात्रा संपणार आणि बद्रीनाथाचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू होणार या कल्पनेने सर्वानाच हुरूप आला होता. अत्यंत, अवघड वळणावळणाचा, हाडं खिळखिळी करणारा हिमाच्छादित पर्वतराजींमधला प्रवास आता शेवटच्या टप्प्यात होता. बद्रीनाथला गाडी देवळापर्यंत जाते. हा सर्वात सोपा धाम! या माहितीमुळे मन निवांत झालेलं. संध्याकाळी पाचची वेळ. बद्रीनाथ मंदिर अवघ्या ९ कि.मी.वर! रात्री तिथेच मुक्काम! सकाळी दर्शन झालं की परतीच्या प्रवासाला सुरुवात. मन आनंदानं उसळत होतं आणि उजव्या बाजूची शांत वाहणारी नदी अचानक उसळ्या घेत वाहू लागली. पांडुकेश्वर मंदिराच्या कमानीसमोर पर्वताचा एक कडा बाहेर आला होता. हिसके देत बस त्या कडय़ाखाली थांबली. रिमझिम पावसाचा धुवाधार पाऊस कधी झाला ते कोणालाच कळलं नाही. संपूर्ण दरीत काळेकभिन्न ढग उतरले होते! खालच्या नदीने आता रौद्र रूप धारण केलं होतं. तिचं रोरावणं ऐकून काळजाचा ठोका चुकत होता. संध्याकाळ सरली. काळोख पडू लागला. गाडीतली गप्पा-गाणी अचानक थांबली! आता संपूर्ण रात्र त्या बसमध्ये भयाण काळोखात, कडाक्याच्या थंडीत आणि मुसळधार पावसात काढावी लागणार याची सगळ्यांना कल्पना आली. भुकेनं जीव व्याकूळला होता. जवळ मनुष्यवस्ती नव्हती. घोटभर पाण्यानं कोरड पडलेला घसा ओला करण्याचे प्रयत्न चालू होते. माणसं देहधर्मासाठी जागा शोधू लागली. पण बाहेरच्या मुसळधार पावसात आणि कडाक्याच्या थंडीत कपडे नेमके कसे सुके  ठेवायचे हाच प्रश्न होता. जवळ होतं ते खाणं तोंडात टाकलं. बसची दारं बंद झाली. दिवे मालवले गेले. पहाटे पाचला प्रवास सुरू केलेले आम्ही प्रवासी हिमालयाच्या कुशीत भयकंपीत मनानं सिटवर निपचीत पडून राहिलो. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता ‘उद्याचं काय?’उद्याचा दिवस उजाडला. सकाळ झाली. परिस्थिती जैसे थे! गाडय़ांची भलीमोठी रांग. गाडीतली माणसं आडोसा शोधण्याच्या मोहिमेवर! पोलीस अथवा प्रशासनाकडून आदल्या रात्रीचे भुकेले, थकलेले शेकडो स्त्रीपुरुष  प्रातर्विधीसाठी पाणी व जागेच्या शोधात भटकत राहिले. जास्त आडोसा शोधण्याच्या नादात पायाखालचा दगड निसटला तर अथांग वाहत्या नदीत जलसमाधी! तेव्हा पहिली कसरत तोल सांभाळण्याची! त्यातही स्लिपडिस्क आणि गुडघ्याची ऑपरेशन्स झालेल्या माणसांची तर आत्यंतिक दैना! रस्ता सुरू होण्याची वाट बघण्यात दुपार उजाडली. सकाळच्या घासभर खिचडीशिवाय पोटात अन्नाचा कण नाही. अखेर तीन वाजता गाडय़ा उलटय़ा फिरवण्यात आल्या. तेवढय़ात निसर्गाने रौद्र रूप धारण केलं. पुन्हा बस एका जागी थांबली. ते चिमोली गाव होतं. ड्रायव्हरने खबर आणली. वाटेत दरड कोसळलीय. तेव्हा मुक्काम इथेच.  माणसं निवाऱ्याच्या शोधात निघाली. चिमोली गावातलं एक लॉज! केवळ विटेवर वीट ठेवून बांधलेलं, कच्चं दुमजली घर. मोडक्या पायऱ्या. आत एक दोन बेडरूमची १० बाय १० ची खोली. त्या एका खोलीतल्या छोटय़ा पलंगावर दहा जणींचा मुक्काम! उरलेली फुटभर जागा प्रचंड मोठय़ा बॅगांनी भरून गेली. आता पावसाचा जोर वाढलेला. लॉजसमोरच नदीचं खळाळतं पात्र. मन घट्ट करून केविलवाण्या चेहऱ्याने पुन्हा मुक्काम! ७० वर्षांनी हा प्रलय अनुभवतोय असं इथले बुजुर्ग सांगत होते.  
सकाळी गाडय़ा सुटल्या. रस्त्याला लागल्या आणि पहिली बातमी आली. काल जिथं जेवलो त्या टिहरी डॅममध्ये पाच वाहनं वाहून गेली. पाठोपाठ दुसरी बातमी. केदारनाथला ढगफुटीने प्रलय झाला. आपण राहिलो ती महाराष्ट्र मंडळाची इमारत वाहून गेली. मंदिर परिसर आणि मार्गातली सगळी दुकानं, टपऱ्या वाहून गेल्या. डोळ्यासमोर गाणी गात हसतमुखाने पालखी वाहणाऱ्या, ‘आप हमारी माँ है। आपको कोई दिक्कत नही होगी’ असं आश्वासन देणारी आणि ती पाळणारी तरणीताठी गढवाली मुलं, मॅगी खिलवणारं नेपाळी जोडपं सगळे क्षणात डोळ्यांसमोर येऊन गेले.
बस पुढे मंद गतीने सरकत होती ती कचकन थांबली. काळजाचा ठोका चुकला. अपेक्षित बातमी आली. पुढे रस्ता वाहून गेलाय. पावसामुळे मिलिटरी काम करू शकत नाही. पुन्हा बसचा मुक्काम! आता ढगफुटी, कडे कोसळणं म्हणजे नेमकं काय ते चांगल कळलं होतं. तीन ठिकाणी जेमतेम डागडुजी केलेल्या रस्त्यावरून बस जाताना ती कोणत्याही क्षणी घसरून नदीत कोसळेल अशी भयावह परिस्थिती! पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! रस्त्याच्या परिस्थितीबाबत माहिती नाही. बस जंगलात थांबलेली. समोर जेमतेम एक रेस्टॉरन्ट! त्याला विनंती केली. त्याने त्याच्या टेबल-खुच्र्या हलवल्या आणि बायकांना पाठ टेकायला जागा करून दिली. त्या टिचभर हॉलमध्ये फाटक्या संतरंज्यांवर चाळीसजणी पाठीला पाठ लावून झोपल्या. तिथे फिरणाऱ्या पाली आणि किडय़ांनी पवित्र केलेलं अन्न खाऊन उद्या पोटाची परिस्थिती काय असेल याचं भय सगळ्यांच्या मनांत दाटलेलं.
सकाळ झाली. आजही पुढे काय वाढून ठेवलंय ठाऊक नाही. एवढंच कळलं, की श्रीनगर (उत्तराखंडमधील एक गाव) मधला हरिद्वारकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा संपूर्ण पूल कोसळलाय. ड्रायव्हरने गाडी पुढे सोडायचा निर्णय घेतला. आणि निसर्गाने केलेले विध्वंस याचि देही याचि डोळा पाहिला. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत काठावरचं घर खचत खचत कोसळून गेलं. कडेकपारीतून येणाऱ्या स्रोताने उसळी मारत वाहणाऱ्या पाण्यात कितीतरी गाडय़ा, माणसं, सिलेंडर्स वाहत जाताना पाहिली आणि दरदरून घाम फुटला. पुढच्या क्षणी आपण कुठे असू? त्या जीवघेण्या प्रपातात की वाहून गेलेल्या रस्त्यावर! रस्ता खचलेला असताना त्यावरून गाडी काढताना दोन चाकं रस्त्यावर आणि दोन चाकं अधांतरी! सलाम त्या ड्रायव्हरच्या हिमतीला आणि कौशल्याला! वाटेत कडे कोसळल्याने पडलेल्या दगडधोंडय़ांवरून जाताना बस असह्य़ हेलकावे खायची आणि वाटायचं ही कोणत्याही क्षणी आता दरीत कोसळेल. जन्म आणि मृत्यू यामध्ये किती सूक्ष्म सीमारेषा आहे त्याचं भयाण दर्शन मन सुन्न करून टाकत होतं.
चार तासांनी बस खाकरा गावी आली आणि एका पुलावर थांबली. मिलिटरीची वाहनं आणि दुरुस्तीची वाहनं ये-जा करत होती. त्यांतल्या एकाला विचारलं, रास्ता कब खुलेगा? त्याने तीन बोटं उंचावली आणि आमचा धीर खचला. आता जवळ पैसे फारसे उरले नव्हते. खाणंपिणं संपत आलं होतं. तशाही परिस्थितीत सर्वजण शांतचित्ताने मोरयाचं स्मरण करत होते. ज्या पुलावरून गाडी जाणार होती तो संपूर्ण पूल वाहून गेला होता. आता हरिद्वारमार्गे दिल्लीकडे प्रयाण अशक्य होतं.
दुसऱ्या मार्गाचा शोध सुरू झाला. पौडीमार्गे दिल्लीकडे जाता येईल असं कळलं. पण त्या खडतर रस्त्यावरून गाडी काढायला ड्रायव्हर राजी नव्हते. आमच्या डोळ्यासमोर त्यावरून एक बस गेली आणि तोही रस्ता नदीच्या बाजूने खचला. स्थानिक लोक आणि पोलीस आले. त्यांनी गर्डर टाकले. दुकानाच्या पायऱ्या तोडल्या. तरीही धोका टळला नव्हता. तीनपैकी एक बहादूर ड्रायव्हर तयार झाला. त्याने तीनही बस एकटय़ाने त्या तकलादू रस्त्यावरून काढल्या. आता सुरू झाला एक जीवघेणा प्रवास! अत्यंत चिंचोळा रस्ता. पावसाने जागोजागी वाहून गेलेला. समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना ड्रायव्हर कौशल्याने गाडी रिव्हर्स घेऊ लागला की मनात बाप्पाचा धावा सुरू होई. अखेर २१ तासांनी गाडी दिल्लीत आली. जीवन आणि मृत्यूचा पाठशिवणीचा आमचा खेळ संपला. मुंबईत आलो पण एका डोळ्यात अश्रू आहेत आनंदाचे तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत दु:खाचे, कणवेचे. त्या प्रलयात अडकून पडलेल्या आमच्या बांधवांसाठी!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा