गणेशोत्सवाला काही दिवस बाकी आहेत. दोन सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होईल. मोठ-मोठ्या मंडळामध्ये गणरायाचे आगमन सुरू झाले आहे. गुजरातमध्ये गणरायाच्या आगमनावेळी एक दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे गणेशमूर्ती आणतेवेळी वीजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. येथील आदर्श मार्केटमध्ये बुधवारी गणपतीची भव्य २९ फूट मूर्ती आणत असताना दुर्दैवी घटना घडली. वीजेच्या तारेत गणपती मूर्तीची मान अडकली होती. ती काढण्यासाठी गेलेल्या दहा जणांना शॉक लागला.
यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पावसाचं वातावरण असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात अमित आणि कुणाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.