जम्मू काश्मिरातील गंदरबलमध्ये आभाळ फाटल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गंदरबाल जिल्ह्यात ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडाला असून, अचानक झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. गंदरबलमधील ढगफुटी झालेल्या भागातील दृश्ये समोर येऊ लागली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलं असून, नद्यांनाही पूर आला आहे. ढगफुटीमुळे घरांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील धरमसाला येथेही अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जम्मू काश्मीरमधील गंदरबाल आणि हिमाचल प्रदेशातील धरमसाला येथे पावसाने हाहाकार उडवला आहे. गंदरबाल जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे. ढगफुटी झाल्याने जिल्ह्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटी होण्यापूर्वी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. तुफान पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच ढगफुटी झाल्यानं हाहाकार उडाला आहे.

गंदरबालमधील काही भागात प्रचंड नुकसान झालं असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. असंख्य घरांचं नुकसान झालं आहे. यात सुदैवान कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी ढगफुटी झाल्यानं अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यानं अनेक महामार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

धरमसाला येथेही पूर परिस्थिती

हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या धरमसाला येथेही मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूराचा अनेक घरांना तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी घरांबरोबर वाहनंही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. धरमसाला येथे रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशातील धरमसाला आणि शिमला सहित अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं आहे. जम्मूतील गंदरबालबरोबरच धरमसाला येथेही ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कूल्लूतील सरवरी नदीनेही रौद्रवतार धारण केला आहे. नदी काठावरील घरं धोक्यात आली आहेत.

हिमाचल प्रदेशातील भागसू नाग येथे अनेक वाहन पुराच्या तडाख्यात सापडून वाहून गेली आहेत. मंडी-पठाणकोट महामार्गावरील राजोलमध्ये पुलाचं नुकसान झालं आहे. याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. रामपूर जवळही पावसाचा जोर वाढल्यानं राष्ट्रीय महामार्गही बंद करण्यात आला होता. अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी मानवी वस्त्यांमध्येही शिरलं आहे. नदीचं पाणी घरापर्यंत आल्याने नागरिक सुरक्षित ठिकाणी धाव घेऊ लागले आहेत. शिमल्यामध्येही तुफानी पाऊस झाला असून, झाकरी आणि रामपूर येथून जाणारा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganderbal cloudburst ganderbal triggers flash floods cloudburst video jammu kashmir bmh
Show comments