राष्ट्रपती महात्मा गांधी यांचे कार्य आणि त्यामुळे त्यांना दिला जाणारा मान हा देशाच्या दृष्टीने मोठा आहे. भारतात गांधीना ज्याप्रमाणे मान दिला जातो त्याचप्रमाणे परदेशातही त्यांच्या कामाचे कौतुक होताना दिसते. याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. गांधींच्या मृत्यूला इतकी वर्षे होऊनही दुबईसारख्या देशातही या महानेत्याची आजही दखल घेतली जाते. २ ऑक्टोबरला १५० व्या गांधीजयंतीच्या निमित्ताने दुबईच्या बुर्ज खलिफावरुन गांधींना मानवंदना देण्यात आली. त्यामुळे बुर्ज खलिफाचा नजारा अतिशय पाहण्यासारखा दिसत होता. भारताच्या ध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरवा अशा रंगांची रोषणाई या बुर्ज खलिफावर करण्यात आली होती. याबरोबरच त्याच्या मध्यभागी गांधीजींचा चेहराही काढण्यात आला होता.
#WATCH: Dubai’s Burj Khalifa was lit up with Mahatma Gandhi’s picture and quotes on his 150th birth anniversary. (2.10.2018) #GandhiAt150 pic.twitter.com/zCU1dNtShS
— ANI (@ANI) October 3, 2018
त्यावर गांधीजींचा एक संदेश लिहीण्यात आला होता. NO CULTURE CAN LIVE IF IT ATTEMPTS TO BE EXCLUSIVE असा तो संदेश होता. संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वात उंच इमारतीला अशापद्धतीने सजवणे ही भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. ही संपूर्ण सजावट एलईडी दिव्यांनी करण्यात आल्याने अंधारात ही रोषणाई अतिशय आकर्षक दिसत होती. भारतीय विदेश मंत्रालयाकडून दुबईने केलेल्या या गोष्टीची विशेष दखल घेण्यात आली. संपूर्ण जगभरात १२० हून अधिक ठिकाणी गांधी जयंती साजरी करण्यात आली. देशातीलच नाही तर जगभरातील अनेक नेत्यांनी गांधीजींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपली कारकीर्द गाजवली आहे. यामध्ये मार्टीन ल्यूथर किंग, दलाई लामा, नेल्सन मंडेला यांसारख्या मोठ्या नेत्यांची नावे घेता येतील.