आफ्रिका खंडामधील मलावी या देशामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यावरून वाद सुरु झाला आहे. देशाची राजधानी असणाऱ्या ब्लांटायर शहरामध्ये महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात जवळजवळ तीन हजारहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर स्वाक्षरी करून या पुतळ्याला विरोध दर्शवला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी काहीही केले नसल्याने त्यांच्या पुतळा आपल्या राजधानीत नको अशी भूमिका या नागरिकांनी घेतली आहे.

ब्लांटायर शहरामधील एका रस्त्याचे नामकरण महात्मा गांधींच्या नावे करण्यात आले आहे. त्याबरोबरच मागील दोन महिन्यांपासून गांधींजींचा पुतळा बनवण्याचे कामही सुरु होते. मलावी सरकारने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार एका करारानुसार महात्मा गांधींचा हा पुतळा उभारण्याची योजना आहे. या करारानुसार भारत सरकार एक कोटी डॉलरची गुंतवणूक करून शहरामध्ये एक सांस्कृतिक केंद्र उभारणार आहे.

सरकारच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी ‘गांधी मस्ट फॉल’ गट तयार केला आहे. त्यांनी सोशल मिडियावर #GandhiMustFall हा हॅशटॅग वापरून आपला विरोध दर्शवला आहे. मलावी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये गांधींचे कोणत्याच प्रकारचे योगदान नाहीये, त्यामुळे देशातील लोकांवर गांधींचा पुतळा उभारण्याचा हा प्रकल्प लादला जात आहे असं अनेकांचं मत आहे.

“या पुतळ्याच्या माध्यमातून परदेशातील लोक मलावीमधील लोकांवर दबाव आणू पाहत आहेत. आपली प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने हा पुतळा उभा करण्याचा काही जणांचा मानस आहे. तसेच गांधीजी वर्णद्वेषीही होते. आफ्रिकन आणि भारतीय लोकांना कामाच्या ठिकाणी एकाच प्रवेशद्वारामधून प्रवेश मिळावा याला गांधीजींनी विरोध केला होता,” या गटाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच त्यांनी यासाठी लढा देऊन भारतीय व आफ्रिकन कामगारांसाठी वेगवेगळे प्रवेशद्वार असावे ही मागणी मान्य करून घेतली होती असा दावाही या गटाने केला आहे.

तर दुसरीकडे मलावा सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्य सचिव इसाका मुनलो यांनी या प्रकल्पाची पाठराखण केली आहे. महात्मा गांधींनी शांततेच्या मार्गाने समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढाई दिली, नागरिकांच्या अधिकारांसाठी त्यांनी लढा दिला हे सर्वांना स्वीकारायला हवे असे मत मुनलो यांनी व्यक्त केले. “तसेच आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांसाठी महात्मा गांधी आदर्शस्थानी होते. गांधीचा या स्वातंत्र्य सैनिकांवर मोठा प्रभाव होता. महात्मा गांधींनी भारत व दक्षिण आफ्रिका या दोन्ही ठिकाणी मानवाधिकारांचा प्रचार व प्रसार केला,” असं मुनलो म्हणाले.

मलावी आणि भारतामध्ये १९६४ पासून राजकीय संबंध आहेत. मलावीला अनेक क्षेत्रांमध्ये पाठिंबा देणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताचा प्रामुख्याने समावेश होतो.

याआधीही हाटवण्यात आलाय महात्मा गांधींचा पुतळा

महात्मा गांधींच्या पुतळ्यावरून आफ्रिकेमध्ये वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही दोन वर्षांपूर्वी घाना देशामध्ये विद्यापीठाच्या आवारामधून गांधीजींचा पुतळा दुसऱ्या जागी हलवण्यात आला होता. त्यावेळीही महात्मा गांधी वर्णद्वेषी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. तर २०१५ साली जोहान्सबर्ग येथील महात्मा गांधी चौकातील गांधीजींच्या पुतळ्यावर पांढरा रंग फेकण्यात आला होता.

Story img Loader