गांधीजी, संघबंदीची प्रकरणे वगळण्यावर काँग्रेसची टीका; आधी केलेल्या चुकांची दुरूस्ती, भाजपचे प्रत्युत्तर
पीटीआय, नवी दिल्ली
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) बारावीच्या राज्यशास्त्र पाठय़पुस्तकातून महात्मा गांधी, संघबंदी आदी विषयांवरील काही उतारे काढून टाकण्यावरून काँग्रेस, भाजपमध्ये बुधवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. कितीही प्रयत्न केला, तरी इतिहास पुसला जाऊ शकत नाही अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. तर भूतकाळात झालेल्या चुका दुरूस्त केल्या जात असल्याचे प्रत्युत्तर केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिले.
‘एनसीईआरटी’च्या बारावी समाजशास्त्र विषयाच्या ‘पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स पार्ट-२’ या पाठय़पुस्तकात महात्मा गांधींच्या हत्येचा देशातील धार्मिक स्थितीवर परिणाम, गांधींजींच्या धार्मिक ऐक्याच्या संकल्पनेमुळे हिंदू धर्माधांना मिळालेली चिथावणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळासाठी लादलेली बंदी आदी उतारे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर काँग्रेसने केंद्र सरकार, संघावर सडकून टीका केली. ‘तुम्ही पाठय़पुस्तकांमध्ये बदल करू शकता, मात्र देशाचा इतिहास बदलू शकत नाही. भाजप आणि संघाला कितीही प्रयत्न करू दे, ते इतिहास पुसून टाकू शकत नाहीत,’ अशा शब्दांत खरगे यांनी तोफ डागली.
१९९८-९९मध्ये रालोआच्या पहिल्या सरकारांनीच अभ्यासक्रम बदलण्याची मोहीम सुरू केल्याचा आरोप काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला. याला प्रत्युत्तर देत करंदलाजे म्हणाल्या, की काँग्रेस पक्षानेच देशाच्या इतिहासाची सर्वाधिक मोडतोड केली आहे. भाजप केवळ भूतकाळात झालेल्या चुकांची दुरूस्ती करत आहे.
बदल गेल्यावर्षीचे, एनसीईआरटीचे स्पष्टीकरण
यावर स्पष्टीकरण देताना ‘एनसीईआरटी’चे संचालक दिनेश सकलानी म्हणाले, की अभ्यासक्रम तर्कसंगत बनवण्याचे काम गेल्या वर्षी झाले आहे. यंदा या संदर्भात काही नवे घडलेले नाही. परंतु अभ्यासक्रम ‘तर्कसंगत’ करताना वगळलेल्या भागांबाबत भाष्य करणे मात्र सकलानी यांनी टाळले. तर करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार कमी करण्यात आल्याचे स्पष्टिकरण एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
शीखविरोधी दंगलीचा ‘धडा’ कायम पुस्तकातून २००२ च्या गुजरात दंगलीचे धडे वगळण्यात आले असले तरी १९८४ च्या शीखविरोधी दंगलींचे उतारे मात्र कायम आहेत. ‘प्रादेशिक अपेक्षा’ या विभागात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदायाविरुद्ध उसळलेल्या हिंसाचाराचा उल्लेख आहे. परिस्थिती शांत करण्यासाठी सरकारने खूप उशिरा पावले उचलल्याने शीख समाज दुखावला, ज्यांनी हिंसाचार केला त्यांना कठोर शिक्षा झाली नाही, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००५ मध्ये संसदेत या रक्तपाताबद्दल खेद व्यक्त केला आणि देशाची माफी मागितली, आदी सर्व तपशील देण्यात आला आहे.