महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा चिनी लोकांवरील प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे त्यांची शिकवण आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग होऊ लागली आहे. अगदी बालवर्गापासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या पाठय़पुस्तकांमध्ये गांधीजींच्या शिकवणीस सन्मानाचे स्थान देण्यात आले आहे.
भारताचे माजी राजनैतिक अधिकारी पी. ए. नाझरेथ यांनी लिहिलेल्या ‘गांधीज् आऊटस्टँडिंग लीडरशिप’ या पुस्तकाचा क्यू न्यू शँग यांनी चिनी भाषेत अनुवाद केला, त्याच्या प्रकाशनाच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पूर्वी महात्मा गांधींबद्दल एखाद-दुसऱ्या चिनी व्यक्तीलाच माहिती असे मात्र आता परिस्थिती सुधारली आहे. गांधीजींची सत्याग्रही चळवळ, त्यांचे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान याबाबत चिनी जनतेमध्ये आदराची भावना आहे, असे क्यू न्यू शँग यांनी सांगितले.
साऊथ शिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक असलेल्या क्यू न्यू शँग यांनी सांगितले की, अगदी बालवर्गापासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतच्या अभ्यासक्रमांत गांधीजींच्या विचारांना स्थान देण्यात आल्याने गांधीविचारांचा प्रसार चीनमध्ये झपाटय़ाने झाला आहे.
बालवर्गामध्ये चित्ररूपाने, प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रमांत भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या अभ्यासाच्या रूपात गांधीजींनी मांडलेल्या अहिंसेच्या तत्त्वाची ओळख  विद्यार्थ्यांना करून दिली असल्याचे, क्यू न्यू शँग यांनी नमूद केले.
एकदा बीजिंग विद्यापीठामध्ये आपल्याला गांधीजींच्या जीवनावर व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले, अशी आठवण सांगताना तेथेही प्रतिवर्षी गांधी अभ्यासकांची संख्या वाढतच आहे, असे शँग यांनी आनंदाने सांगितले.

Story img Loader