पाच राज्यांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावरुन चर्चा रंगली असून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. रविवारी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरिक्षण बैठक झाली. या बैठकीत पक्षनेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षपद स्वीकारावे, असा सूर आळवल्याचे सांगण्यात आलं. मात्र, तूर्त तरी सोनिया गांधी यांच्याकडेच अध्यक्षपद राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

नेतृत्व सोनियांकडेच ! ; तूर्त बदल न करण्याची काँग्रेसची भूमिका

बैठकीला उपस्थित काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावे, यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वरिष्ठ नेत्यांनी गांधी कुटुंबावर अविश्वास व्यक्त केला नव्हता, किंबहुना कार्यकारी समितीच्या बैठकीपूर्वी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणं ही एक प्रथाच बनली आहे. या वेळच्या बैठकीपूर्वीही असंच घडलं.

गांधी कुटुंबाची राजीनाम्याची तयारी

या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपले कुटुंबीय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासहित राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र यावेळी कार्यकारी समितीने हा प्रस्ताव एकमताने नाकारला अशी माहिती पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.

एएनआयशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, “सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देशासाठी पक्षातील आपल्या पदाचा त्याग करण्यास तयार आहेत”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा यांनी आपण आणि आपले कुटुंबीय राहुल गांधी, प्रियंका गांधी देशासाठी आपल्या पदाचा त्याग करण्यास तयार आहेत असं म्हटलं. पण आम्ही त्यास नकार दिला”. कार्यकारिणी समितीने यावेळी पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल ही चिंतेची बाब असल्याचं सांगितलं आहे.

संसद अधिवेशनात विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारविरोधात एकजुटीच्या प्रयत्नांना आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष अपेक्षित प्रतिसाद देणार नाहीत, असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे विरोधकांची बैठक बोलावण्याआधी चाचपणी करण्यासाठी संबंधित पक्षांशी संपर्क करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आल्याचे समजते.

पक्षमजबुतीसाठी सर्व बदल करण्याची सोनियांची इच्छा

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व नेत्यांची मते ऐकून घेतली आणि पक्षमजबुतीसाठी आवश्यक ते सर्व बदल करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनी पक्षाचे ‘चिंतन शिबिर’ राजस्थानमध्ये आयोजित करावे, अशी सूचना बैठकीत केली.

Story img Loader