भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. केनेडी स्पेस सेंटरमधून उद्या (७ मे) रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८ वाजता नव्या अवकाश यानातून त्या अवकाशाकडे झेपावणार आहेत. एनडीटीव्हीशी बातचीत करताना विल्यम्स यांनी सांगितले की, त्या धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. उद्या बोईंग स्टारलाइन या नव्या अवकाश यानातून अंतराळात झेपावत असताना त्या स्वतःसह त्यांची लकी चार्म असलेली गणपतीची मूर्ती बरोबर नेणार आहेत.
सुनीत विल्यम्स म्हणाल्या की, उद्या अवकाशात उड्डाण घेत असताना मी माझ्यासह माझी आवडती गणपतीची मूर्ती नेत आहे. ही मूर्ती मला ऊर्जा देते. अंतराळात ही मूर्ती माझ्या बरोबर असताना मला आनंद वाटत असतो. सुनीता विल्यम्स यांनी मागच्यावेळी स्वतःबरोबर भगवद्गीतेची प्रत नेली होती.
सुनीता विल्यम्स यांच्या नावावर आजवर अनेक विक्रमांची नोंद झालेली आहे. पृथ्वीभोवती सर्वाधिक काळ भ्रमण करणारी पहिली महिला बनण्याचा विक्रम अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या नावावर आहे. तसेच अंतरालात मॅरेथॉन करण्याचाही विक्रम त्यांनी केला आहे. त्याशिवाय तब्बल ५० तास ४० मिनिटं अंतराळात पदयात्रा करण्याचाही विक्रम त्यांनी केलेला आहे. सुनीता विल्यम्स यांनी याआधी २००६ आणि २०१२ मध्ये अंतराळात उड्डाण घेतले होते. नासाच्या आकडेवारीनुसार त्यांनी अंतराळात एकूण ३२२ दिवस वास्तव्य केले आहे.
२०१५ साली नासाच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश वाहनातून उड्डाणासाठी चार अवकाशयात्रींची निवड करण्यात आली होती. त्यात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांचाही समावेश करण्यात आला होता. बोईंग स्टारलाइनर हे मानवांना अंतराळात घेऊन जाणारे पहिले अवकाश यान आहे.