पीटीआय, नवी दिल्ली : बंगळूरुतील ईदगाह मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने या मैदानात गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली होती, त्यास कर्नाटक वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना जमीन यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले.
न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तीनसदस्यीय खंडपीठाने पक्षकारांच्या वादाच्या निराकरणासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. या मैदानात गेल्या अनेक वर्षांपासून ईदच्या दिवशी नमाजपठण केले जाते. त्यामुळे या जमिनीवर आमचा दावा असल्याचे कर्नाटक वक्फ बोर्डाने न्यायालयास सांगितले. १९६४ पासून या मैदानात नमाजपठण केले जात असल्याने ही जमीन आमची संपत्ती आहे. जर येथे गणेशपूजनास परवानगी दिली तर धार्मिक तणाव होण्याची शक्यता आहे, असे वक्फ बोर्डाने सांगितले.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २६ ऑगस्ट रोजी राज्य सरकारला ईदगाह मैदानाचा वापर करण्याची मागणी करणाऱ्या बंगळूरु उपायुक्तांनी प्राप्त केलेल्या अर्जावर विचार करण्याची आणि योग्य आदेश देण्याची परवानगी दिली होती.