आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील गिद्दलूर येथे भारतीय लष्कराच्या २ माजी सैनिकांसह ७ जणांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील दोन संशयित आरोपी पसार झाले आहेत. १७ वर्षांची पीडित मुलगी इंटरमिजिएटची विद्यार्थीनी आहे. के सुरेंद्र नावाच्या संशयिताने पीडित मुलीला प्रथम थंडपेयातून नशेची गोळी दिली होती.
याबाबत पोलीस उपअधीक्षक एन व्ही रमनजनेयुलू यांनी माहिती दिली. ते म्हणाले, पीडित मुलीला थंडपेयातून अंमली पदार्थ दिल्यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने आपल्या मित्रांना बोलावले आणि त्यांनीही त्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला ब्लॅकमेल केले आणि सुमारे एक वर्षभर तिच्यावर बलात्कार करत राहिले.
पीडित मुलगी चिंताग्रस्त दिसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी जेव्हा चौकशी केली. तेव्हा हा प्रकार समोर आला. मुलीने रडत-रडत सगळा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. ९ आरोपींपैकी ७ जणांना पकडण्यात यश आले आहे.
आरोपींमध्ये २ माजी सैनिकांचा समावेश आहे. त्यांना वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवत लष्करातून काढण्यात आले होते. या प्रकरणातील २ आरोपी अजूनही पसार आहेत. आरोपींविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम ३७६ ड, ५०६, ४२० आणि पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सुरु आहे.