झारखंडमध्ये इयत्ता नववीच्या वर्गातील १६ वर्षीय मुलीवर तीन नराधमांनी सलग तीन महिने अत्याचार केला. सोमवारी (२५ जुलै) हे प्रकरण समोर आलं आहे. पीडित मुलीने आरोपीपैकी कुणालाही ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. मंतोष, विष्णू कुमार व मनोज कुमार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी २० एप्रिलला कुटुंबाने पोलीस तक्रार दिली होती. मात्र, तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कोणतेही पाऊल उचलले नाही. तसेच मुलगी परत येईपर्यंत वाट पाहा असं कुटुंबाला सांगितलं.
नेमकं काय घडलं?
या घटनेची माहिती देताना पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं, “१९ एप्रिलला आमची मुलगी कपडे खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती. मात्र, बाजारातून परत येताना तिला ओढत रिक्षात घातलं आणि तोंडाला रुमाल बांधून अपहरण केलं. तिला तेलिदीह भागातील एका खोलीत नेऊन बांधून ठेवण्यात आलं. सलग तीन महिने तीनही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.”
आरोपी खोलीबाहेर जाताना पीडितेच्या तोंडाला रुमाल बांधून आणि घराला कुलुप लावून जात होते. १९ जुलैला या खोलीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने पीडित मुलीला पाहिलं. त्यानंतर या महिलेने खोलीचं कुलुप तोडून मुलीची सुटका केली. सुटकेनंतर पीडित मुलगी घरी आली आणि तिने सर्व घटनाक्रम घरच्यांना सांगितला. घरच्यांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत याविरोधात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार प्रकरण ; माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक
दरम्यान, पोलीस उपाधीक्षक कुलदीप कुमार म्हणाले, “तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदवण्यात येईल. चौकशीत आरोपींची ओळख पटली आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल. आरोपींविरोधात पॉक्सो आणि भारतीय दंड विधानानुसार विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.”