उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात धावत्या रेल्वेमध्ये एका महिला प्रवाशावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ट्रेनमधील टीटीई अर्थात तिकीट तपासणीस आणि त्याच्या एका साथीदाराने महिला प्रवाशावर बलात्कार केला आहे. पीडित महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी टीटीईला अटक केली आहे. तसेच त्याला निलंबितही करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण संभल जिल्ह्यातील चांदौसी परिसरातील आहे. घटनेच्या दिवशी १६ जानेवारी रोजी पीडित महिला आपल्या २ वर्षाच्या मुलासह चांदौसीहून प्रयागराज जिल्ह्याच्या सुभेदारगंज येथे चालल्या होत्या. चांदौसी रेल्वे स्थानकावर त्या पोहोचल्या असता आरोपी टीटीई राजू सिंग तिथे आला. त्याने पीडितेला कुठे जायचं आहे? याबाबत विचारणा केली. सुभेदारगंज येथे जात असल्याचं महिलेनं सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर ‘एवढ्या लांबचा प्रवास एकटी कसा करणार? असं टीटीईने विचारलं. तसेच त्याने पीडित महिलेला एसी कोचमधील सीट बसण्यासाठी दिलं. यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपी टीटीई आपल्या एका साथीदारासह संबंधित एसी कोचमध्ये आला. त्याने साथीदाराच्या मदतीने महिला प्रवाशावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेनं रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.