खुर्चीत बसणाऱ्या मुलीच्या मागील खुर्ची ओढून घ्यायची.. नाचतनाचत ऑफिसात धिंगाणा घालायचा.. जलतरण तलावावर आलेल्या मुलींची छेड काढायची.. अगदी गंगनम स्टाइल! दक्षिण कोरियाई गायक सायच्या नव्या ‘जंटलमन’ या यूटय़ूबवरच्या व्हिडीओतील या करामती. कोरियन द्वीपकल्पावर युद्धाचे ढग अधिकाधिक गडद होत असतानाच शनिवारी यूटय़ूबवर अपलोड झालेल्या हा ‘जंटलमन’ जगभरातील तरुणाईने अक्षरश डोक्यावर घेतला आहे. एवढा की अवघ्या दोन दिवसांत त्याला ५० लाख हिट्स मिळाल्या आहेत. सायचा हा नवा व्हिडीओ लोकप्रियतेच्या बाबतीत त्याच्या आधीच्या गंगनम स्टाइलवरही मात करणार असल्याचे संकेत आहेत.
गेल्या वर्षी जुलैमध्ये साय याने ‘गंगनम स्टाइल’ नावाचा व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड केला. त्याला अवघ्या महिनाभरातच अफाट लोकप्रियता मिळाली. म्हणजे आपल्याकडे ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ला जशी रातोरात लोकप्रियता मिळाली अगदी तश्शीच, किंबहुना त्याहून दुप्पट असे म्हटले तरी चालेल. जस्टीन वेबरच्या ‘बॉयफ्रेण्ड’ या व्हिडीओला त्यापूर्वी अशीच लोकप्रियता लाभली होती. मात्र, मे २०१२ मध्ये आलेल्या या व्हिडीओची लोकप्रियता गंगनमच्या आगमनानंतर झपाटय़ाने कमी झाली आणि गंगनमनेच लोकप्रियतेचा विक्रम प्रस्थापित केला. ६ एप्रिलपर्यंत गंगनमला तब्बल दीड अब्ज हिट्स मिळाल्या होत्या.
‘जंटलमन’ मध्ये नवे काय?
‘जंटलमन’ हा व्हिडीओ गंगनम स्टाइलच्या पुढचे पाऊल म्हणावे लागेल. या नव्या व्हिडीओमध्ये साय त्याच्या नेहमीच्या स्टाइलमध्येच वावरतो. म्हणजे डोळ्यावर तोच त्याचा गंगनम स्टाइलफेम गॉगल, नाचण्याची तीच अदा आणि त्याचा बॅण्ड. तरुणींना छळण्याच्या नवनव्या क्लृप्त्या यामध्ये आहेत. या छेडछाडीतून त्याला गाण्याच्या अखेरीस त्याचे खरे ‘प्रेम’ गवसते आणि तो ‘जंटलमन’ होतो. सेऊलमधील उच्चभ्रू लोकवस्ती, तेथील मोठमोठे मॉल, बगीचे यांचे चित्रिकरण या गाण्यात आहे.
शनिवारी यूटय़ूबवर ‘जंटलमन’ अपलोड झाल्यानंतर सोमवापर्यंत या व्हिडीओला जगभरातील तब्बल ५० लाख नेटीझन्सनी पसंती दिली. फ्रान्स, कॅनडा, न्यूझीलंड, डेन्मार्क आणि स्वीडन येथील आयटय़ून्स स्टोअर्समध्ये तर ‘जंटलमन’ ने तरुणाईच्या सर्वोच्च पसंतीच्या दहा गाण्यांत पहिल्या पाचात स्थान मिळवले! गंगनम स्टाइलच्या लोकप्रियतेचा विक्रमही हा व्हिडीओ मोडेल यात शंका नाही.
‘गंगनम स्टाइल’ म्हणजे काय?
गंगनम हे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलनजीकचे उच्चभ्रू लोकवस्तीचे ठिकाण आहे. येथील आजच्या पिढीतील मुलांची जीवनशैली, त्यांची विचारसरणी, तेथील राहणीमान वगैरे यांचे वर्णन साय याच्या गंगनम स्टाइल या पहिल्या व्हिडीओमध्ये आहे. मात्र, सायने व्हिडीओमध्ये दाखवलेले सर्वच काही खरे नाही असे येथील लोकांचे म्हणणे आहे. येथील लोकांची विचारसरणी व राहणीमान चारचौघांसारखेच असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा