गुरुवारी कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीकडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती. तसंच त्यांना चौकशीकरता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. तब्बल ९ वेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, प्रत्येकवेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं. केजरीवालांना अटक झाल्यावर असा प्रश्न अनेकांना पडला होता कि आता दिल्ली सरकारचं काय होणार? यावर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “केजरीवालच दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील आणि तुरुंगातून आपली कर्तव्ये पार पाडतील”, असे आम आदमी पार्टीने जाहीर केलं होत. “अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. यामध्ये कोणतंही दुमत नाही”, असं आप नेत्या आतिशी यांनी स्पष्ट केल होतं. यावरूनच आता भाजपाचे खासदार आणि दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंगातून टोळ्या चालवल्या जातात, सरकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले मनोज तिवारी?

“तुम्ही टोळ्या चालवायची तयारी करताय का? सरकार चालवण्यासाठी रोज बैठका घ्यायच्या असतात, विविध स्तरांवर पत्रके काढायची असतात, सह्या करायच्या असतात. तुम्ही निवडून गेलात म्हणजे जनेतचा पैसा लुटायला मोकळे झालात का?” असा प्रश्न त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “दिल्लीत त्यांनी कोणतीही कामे केली नाहीत. फक्त दिल्लीकरांना लुबाडायचे काम केले आहे”. याशिवाय फक्त माध्यमांमध्ये केजरीवालांच्या अटकेची चर्चा होत आहे, दिल्लीतील जनतेमध्ये यावर कोणत्याही चर्चा होत नाहीत. केजरीवालांच्या अटकेने जनता आनंदी आहे. एवढंच नाही, तर आपचे नेतेसुद्धा आनंदी आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया मनोज तिवारी यांनी एएनआयशी बोलताना दिली आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, “इंडिया आघाडीतील पक्षांना भीती घालायला ही कारवाई केली आहे. इंडिया आघाडी सत्तेत येईल अशी भीती भाजपाला वाटत आहे. म्हणून अशा कारवाया केल्या जात आहेत.” झारखंडचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करणे हा लोकशाही आणि संविधानावरील हल्ला असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं.

विरेंद्र सचदेव यांची प्रतिक्रिया

दिल्लीचे भाजपा प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याच हातात असल्याचा आरोप करून यातील सत्य लवकरच बाहेर येईल असं म्हटलं आहे. “कायदा सर्वांसाठी सारखा असतो. दोन महिन्यांपासून ईडीच्या नोटिसांना उत्तर दिलं गेलं नाही. कायदा पाळला गेला नाही. त्यामुळे आज हे सिद्ध झालं आहे की कायदा हा सामान्य जनतेला जसा लागू होतो तसाच तो मुख्यमंत्र्याला सुद्धा लागू होतो.” दरम्यान अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी २८ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडीने आपल्या युक्तिवादात काय मांडलं?

न्यायालयासमोरील आपल्या युक्तिवादात ईडीने आरोप केला की व्यावसायिकांकडून पैशांची मागणी करण्याचे मुख्य कटकारस्थान दिल्लीचे मुख्यमंत्री यांनीच केलेले असून पुढे दावा केला की केजरीवाल हे उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मितीमध्ये थेट सहभागी होते. ईडीच्या वकिलांनी दावा केला की, आपचे मीडिया प्रभारी विजय नायर हे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासाठी काम करत होते. ईडीच्या वकिलांनी पुढे असा दावा केला की गुन्ह्यातील कमाई ही केवळ १०० कोटी रुपये नाही तर लाच देणाऱ्यांनी कमावलेला नफा देखील गुन्ह्यातील कमाई म्हणूनच मानला जायला हवा. वकिलांनी सांगितले की हवाल्याचे ४५ कोटी रुपये गोवा निवडणुकीत वापरले गेले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangs run from jail not government manoj tiwari reacts sharply to aap remark spl