कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये रुग्णालयाच्या बाहेरच हत्या करण्यात आली. किमान १० ते १२ पोलिसांच्या गराड्यात पत्रकाराच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी त्या दोघांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. अतिक अहमदच्या तर थेट कानावर बंदूक लावून गोळी झाडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर देशभर या प्रकाराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात न्यायालयीन आयोगामार्फच चौकशी केली जात असून आज पुन्हा एकदा तोच प्रसंग प्रयागराजमधील घटनास्थळी उभा राहिला!
तोच प्रसंग जसाच्या तसा उभा केला!
साधारणपणे अशा प्रकरणांचा तपास करताना तपास संस्था तोच प्रसंग पुन्हा त्याच पद्धतीने नाट्यरुपांतरीत करून उभा करतात. यामुळे गुन्हा घडला तेव्हा नेमकं काय आणि कसं घडलं याचा अंदाज तपास अधिकाऱ्यांना येतो. प्रत्यक्षदर्शी किंवा आरोपी स्वत: यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा उभा करता येतो.
अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्या प्रकरणाचा तपास न्यायालयीन आयोगामार्फत केला जात असून त्यांनीच आज दुपारी प्रयागराजमध्ये हा प्रसंग पुन्हा उभा केला. १५ एप्रिल रोजी अतिक आणि अशरफ या दोघांची हत्या झाली होती. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या जबाबानुसार ही प्रक्रिया यावेळी पूर्ण करण्यात आली.
पुन्हा पोलीस व्हॅनमधून अवतरले अतिक आणि अशरफ!
या प्रक्रियेचा अर्थात क्राईम सीन रीक्रिएशनचा एक व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्वीट केला आहे. यामध्ये अतिक आणि अशरफला हत्या झाली त्या दिवशी जसं रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं होतं त्याच प्रकारे आजही त्यांच्यासारखीच वेशभूषा केलेल्या दोन व्यक्तींना पोलीस बंदोबस्तात रुग्णालयाच्या गेटमधून आत आणण्यात आलं. यावेळी समोर मोठ्या संख्येनं माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते (अर्थात खोटे)! रुग्णालयाच्या आत येताच दोघांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद सुरू केला.
गेटमधून साधारण पाच पावलं पुढे आल्यानंतर त्यांना माध्यम प्रतिनिधींना घेराव घातला. दोन जणांनी त्यांच्यासमोर माईक धरला आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे दोघं त्यांच्याशी बोलतच होते तेवढ्यात डावीकडून एक बंदूक त्यांच्या कानावर आली आणि दोघांनी गोळी झाडली गेल्याची नक्कल केली. अतिक आणि अशरफ पडल्यानंतर समोरून दोन आणि डाव्या बाजूने एका हल्लेखोराने त्या दोघांवर बंदूकीतून गोळ्या झाडल्या होत्या. हे सर्व आजही घडवूव आणण्यात आलं.
अतिक अहमद गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. हत्येपूर्वीही पोलीस बंदोबस्तात त्यानं केलेली विधानं चर्चेचा विषय ठरली होती. पण आता एखाद्या चित्रपटातील वाटावी अशा पद्धतीने त्याची हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.