आपण आत्मसमर्पण केले नसून, पोलिसांनी आपल्याला अटक केली असल्याचे कुख्यात डॉन छोटा राजन याने गुरुवारी काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाली असून, सध्या तो तेथील विशेष कमांडोंच्या सुरक्षा गराड्यात आहे. आपल्याला लवकरात लवकर भारतात परतायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
खंडणी, खून, तस्करी, अमली पदार्थांचा व्यापार अशा विविध गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर भारतात विविध ठिकाणी ७५ गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्याच्याविरूद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटिसही जारी केली होती. ऑस्ट्रेलियन सुरक्षा संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अगदी मोजक्या शब्दांत त्याने आपल्या अटक झाली असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपल्याला लवकरात लवकर भारतात परतायचे आहे, असेही त्याने म्हटले आहे.
छोटा राजनला भारतात आणण्यासाठी लवकरच भारतीय सुरक्षा संस्थाचे अधिकारी इंडोनेशियात जाणार आहेत. त्याला कशा पद्धतीने आणि कधी भारतात आणले जाईल, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबद्दल वरिष्ठ पातळीवर अत्यंत गोपनीयता बाळगण्यात येते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा