सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात मूसेवाला यांचा मृत्यू झाला. मूसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्या शरीरात अनेक गोळ्या शिरल्याचे मानसाचे पोलीस उपअधीक्षक गोबिंदर सिंग यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही.के. भवरा यांनी सांगितले की, जेव्हा सिद्धू मुसेवाला घरातून बाहेर पडले तेव्हा वाटेत समोरून २ वाहने आली आणि त्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.

मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे.

“सर्व भावांना राम राम, सत् श्री अकाल, मूसेवालाच्या हत्येची आज, मी गोल्डी ब्रार, सचिन विश्नोई, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप याची जबाबदारी घेतो. आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येसाठी त्याने मदत केली होती. त्याचा बदला आम्ही आज घेतला आहे,”असे गोल्डी ब्रारने फेसबुकवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

आमच्या साथीदाराच्या हत्येप्रकरणी मुसेवालाचे नाव समोर आल्यानंतरही पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुसेवालाची जास्त ओळख असल्यामुळे त्याला शिक्षा झाली नाही. त्यामुळेच आज ही हत्या करण्यात आली आहे.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येपूर्वी एसयूव्हीचा पाठलाग करत होत्या गाड्या

कोण आहे गोल्डी ब्रार?

गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे. त्याचवेळी त्याचा साथीदार आणि टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा राजस्थानमधील अजमेर तुरुंगात बंद आहे. मूसेवाला यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळावरून तीन एके-९४ रायफलच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

अनेक गुन्ह्यांमध्ये ब्रार फरार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फरीदपूर येथील न्यायालयाने जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने १ मे २०२२ रोजी भटिंडा येथून गोल्डी ब्रारच्या तीन जवळच्या साथीदारांना अटक केली होती. माळवा भागातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाकडून तो पैसे उकळणार होता, असे सांगण्यात आले होते.

पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडच्या विद्यार्थी राजकारणातून प्रत्यक्षात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव झपाट्याने पुढे आले. पंजाबमध्ये दविंदर बंबिहा ग्रुप आणि लॉरेन्स बिश्नोई ग्रुपमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. २०१६ मध्ये झालेल्या चकमकीत दविंदर बंबीहा मारला गेला होता. मात्र त्यानंतरही त्यांचा गट आजही सक्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंबिहा ग्रुप आर्मेनियामध्ये बसलेल्या लकी पटियालच्या नेतृत्वाखाली चालतो.

७ ऑगस्ट २०२१ रोजी मोहालीमध्ये युवा अकाली नेते विक्रम सिंह उर्फ ​​विक्की मिड्दुखेडा यांची हत्या करण्यात आली होती. याची जबाबदारी बंबिहा ग्रुपने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली होती. विकी मिड्दुखेडा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत असल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचे बंबिहा ग्रुपने म्हटले होते. लॉरेन्स बिश्नोई गटाने मुसेवाला या हत्येत सामील असल्याचा दावा केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster goldie brar took responsibility for killing sidhu musewala reason written in fb post abn