कॅनडात राहून भारतात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारबाबत केंद्र सरकारनं पाऊल उचललं आहेत बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत ( यूएपीए ) गोल्डी ब्रारला दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. गोल्डी ब्रार पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
गृहमंत्रालयानं गोल्डी ब्रारबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. त्यात म्हटलं, “गोल्डी ब्रारचे प्रतिबंधित खलिस्तानी संघटना बब्बर खालसाशी संबंध आहेत. तसेच, सीमेपलीकडे दहशतवादी संघटनांचा गोल्डीला पाठिंबा असून अनेक हत्यांशी त्याचा संबंध आहे. नेत्यांना धमकी देणं, खंडणी मागणं आणि हत्येनंतर गोल्डी ब्रारकडून सोशल मीडियावर जबाबदारी घेण्यात येते.”
“पंजाबमधील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट गोल्डी ब्रार आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून रचण्यात येत आहे. त्यात दहशवादी कारवाया करणे, हत्या करणे आणि अन्य कृत्यांचा सहभाग आहे. तसेच, गोल्डी ब्रार सीमेपलीकडून ड्रोनमार्फत शस्त्रे, दारूगोळा, स्फोटकांसाठी साधनं पुरवत होता,” असंही गृहमंत्रालयानं पत्रकात सांगितलं आहे.
सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रार सध्या कॅनडात आहे. तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात समजला जातो. गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून बिश्नोई गँगच्या टोळीतील हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या केली होती. कॅनडात बसूनच गोल्डी ब्रारनं सिद्धू मुसेवाल्याचा हत्येचा प्लॅन आखला होता. मुसेवालाच्या हत्येनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून गोल्डी ब्रारनं मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.