दिल्लीतील एक लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या लग्नालाही जेवढा फौजफाटा नसतो, तेवढा पोलिसांचा लवाजमा या लग्नासाठी तैनात करण्यात आला होता. पण या लग्नात वरात नव्हती. पाव्हण्या रावळ्यांचा मान-पान वैगरे काही भानगड नव्हती. कारण लग्न होतं कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन गँगस्टरचं. कुप्रसिद्ध गँगस्टर काला जठेडी उर्फ संदिप झांझरिया आणि अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिन्झ यांचं मंगळवारी दिल्लीच्या द्वारका येथे लग्न पार पडलं. या लग्नासाठी २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनास्थळी काही गडबड होऊ नये म्हणून मेटल डिटेक्टर आणि ड्रोन्सचीही करडी नजर होती. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

मंडोली कारागृहात असेलल्या काला जठेडीला सकाळी १० वाजता लग्न मंडपात आणलं गेलं. द्वारकामधील संतोष गार्डन येथील हॉलमध्ये हा समारंभ होत असताना त्याचा मनस्ताप मात्र स्थानिका झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानं सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तसेच दोन-तीन दिवसांपासून परिसरात गस्त घातली होती.

Tight security for gangster Sandeep alias Kala Jathedi’s marriage
विवाहस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वारका दक्षिण आणि बिंदापूर पोलीस ठाण्यातून १५० हून अधिक पोलीस विवाहस्थळी तैनात करण्यात आले होते. तसेच तिसऱ्या बटालियनचे जवानही होते. घटनास्थळाहून पळून जाण्याचा प्रयत्न किंवा जठेडीच्या विरोधी गँगकडून कोणताही हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले होते.

Kala Jathedi’s marriage with “history-sheeter” Anuradha Choudhary
प्रत्येक निमंत्रिताची चौकशी करूनच आत सोडलं जात होतं. त्यासाठी मेटल डिटेक्टरही बसविण्यात आले.

कडक बंदोबस्तात होत असलेल्या या लग्नाला फक्त १५० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. पोलिसांकडून प्रत्येक निमंत्रिताची कसून चौकशी केली गेली. त्यांचे आधार कार्ड तपासले गेले. काला जठेडीचा भाऊ प्रदीपने सांगितले की, आम्हाला हा समारंभ छोटेखानीच ठेवायचा होता. जेणेकरून जास्त गर्दी याठिकाणी जमू नये. गर्दी जमली असती तर त्यातून काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका अद्भवू शकला असता. ज्यांचे निमंत्रिताच्या यादीत नाव नव्हते, अशा पाहुण्यांना गेटवरूनच परत पाठविले गेले. जठेडीचा चुलत भाऊ सुर्या झांझरिया विवाहस्थळी थोड्या उशीरा पोहोचला, त्यामुळे त्याला आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही.