प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीने चौकशीदरम्यान ही माहिती दिली होती. मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये नेपाळ पोलिसांनी दीपक मुंडीसहीत कपिल पंडित आणि राजिंदर दोन शार्प शूटर्सलाही अटक केली. त्यातील कपिल पंडित याने सलमानच्या हत्येच्या कटाची माहिती पोलिसांना दिली होती. त्यात आता सलमान खानला मारण्यासाठी दुसरा प्लॅनदेखील तयार असल्याचं समोर आलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानचे पनवेलमध्ये फार्महाऊस आहे. तिथेच शार्प शूटर्संनी रेकी करण्यासाठी भाड्याने एक घर घेतले होते. दीड महिना त्यांनी सलमान खानची रेकी केली. तेथील घरात सलमान खानला मारण्यासाठीचे हत्यार, पिस्तुल, काडतुसेही ठेवण्यात आले होते. शार्प शूटर्संना माहिती होती, हिट अँड रन प्रकरणापासून सलमान खानची गाडी कमी स्पीडने चालवली जाते. तसेच, फार्म हाऊससाठी जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे असल्याने सलमानची गाडी २५ किलोमीटर ताशी वेगाने जात असल्याची माहिती शूटर्संकडे होती.
पनवेलमधील फार्म हाउसवर असलेल्या सुरक्षारक्षकांशी सुद्धा शार्प शूटर्संनी मैत्री केल्याचं समोर आलं आहे. यामुळे सलमान खानच्या प्रत्येक हालचालीची माहिती त्यांना मिळत होती. दोन वेळा शार्प शूटर्संनी सलमानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो फसला गेला. अन्यथा सिद्धू मुसेवाल्याच्या पूर्वीच सलमान खानच्या हत्येचा कट लॉरेन्स बिश्नोई गँगने रचला होता. याबाबतचे वृत्त एनडिटिव्हीने दिलं आहे.