Lawrence Bishnoi : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. त्याआधी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, तेव्हाही लॉरेन्स बिष्णोई हे नाव चर्चेत होतं. या दोन्ही प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीने समाजमाध्यमांवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई हा तुरुंगात आहे. मात्र, लॉरेन्स बिश्नोई हा तुरुंगात असूनही टोळी कशी चालवतो? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा नेमकी कुठला आहे? तो गँगस्टर कसा झाला? त्याचे कुटुंब काय करते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आता यासंदर्भात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोईने माहिती देताना सांगितलं की, “लॉरेन्स बिश्नोईचे कुटुंब श्रीमंत आहे. लॉरेन्सचे वडील हरियाणा पोलिसात हवालदार होते. त्यांची गावात ११० एकर जमीन आहे. बिश्नोई नेहमी महागडे कपडे आणि शूज घालत असे. खरं तर आताही त्याचे कुटुंब तुरुंगात त्याच्यावर वर्षाकाठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च करते”, असं लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ रमेश बिश्नोईने सांगितल्याचं एका वृत्तात इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘सलमान खाननं आता दुसरा गुन्हा केला’, सलीम खान यांच्या टिप्पणीनंतर बिश्नोई समाजाचा संताप

तसेच जवळपास एका दशकापूर्वी लॉरेन्स बिश्नोईला आपण न्यायालयाच्या एका सुनावणीसाठी आणले होते, तेव्हा शेवटचे पाहिले होते, असंही रमेश बिश्नोईने म्हटलं आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोईचे वडिलोपार्जित गाव पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे. माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई हा २००८ मध्ये पहिल्यांदा तुरुंगात गेला होता. तसेच तो महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याने विद्यार्थी संघाच्या निवडणुकीदरम्यान प्रतिस्पर्ध्यावर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कोण आहे लॉरेन्स बिष्णोई?

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमधील उच्चभ्रू कुटुंबात झाला आहे. अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतले. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता सुरुवातीपासूनच श्रीमंत होते. त्यांची वडिलोपार्जित शेकडो एकर जमीन आहे. तसेच लॉरेन्सचे कुटुंबिय पदावर कार्यरत आहेत. लविंदर हे पोलीस हवालदार पदावर कार्यरत होते. त्याच्या वडिलांना त्याला पोलीस अधिकारी करायचे होते. पण लॉरेन्सने वेगळा मार्ग निवडला. महाविद्यालयात असतानाच त्याने विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या माध्यमातून पुढे त्याने टोळी उभी केली. चंडीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सचा गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव झाला. त्याच्या नावावर अनेक गुन्हे नोंद आहेत.

सिद्धू मुसेवाला हत्येतही हात

प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येच्या प्रकरणातही लॉरेन्स बिष्णोईचा सहभाग होता, अशी माहिती समोर आली होती. त्या २०२२ मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर बिष्णोई टोळी चर्चेत आली होती. पंजाबमधील गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा कॅनडास्थित साथीदार गोल्डी ब्रार याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हत्येनंतर बिष्णोई टोळी प्रथम देशपातळीवर चर्चेत आली.