कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गँगस्टर मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता.
मुख्तार अन्सारीला २०२२ मध्ये शिक्षा झाली होती. त्यानंतर पुन्हा दोन प्रकरणात अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुख्तार अन्सारीवर ६१ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. मुख्तार अन्सारी याच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेश पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. बांदा, आणि गाजीपूर भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
मुख्तार अन्सारी कोण हाता?
मुख्तार अन्सारी पाच वेळा आमदार राहिला होता. अन्सारीवर ६५ पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. मुख्तार हा तुरुंगातूनही गँग चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. मुख्तार अन्सारी याचा एक भाऊ विद्यमान खासदार आहे. उत्तरप्रदेश सरकारने मुख्तार अन्सारीवर कारवाई करत जवळपास ६०५ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. तसेच त्याचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सरकारने बंद केले होते.
मायावती यांनी काय ट्विट केले?
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी ट्विट करत, “मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या शंका आणि गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी आवश्यक आहे. जेणेकरून मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे तथ्य समोर येऊ शकेल. अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंबिय दुःखी होणं हे स्वाभाविक आहे. कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो”, असे मायावती यांनी म्हटले.
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची चौकशी होणार?
मुख्तार अन्सारी यांना विषारी औषध देण्यात आले असल्याचा आरोप मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मुलाने केला आहे. या प्रकरणात चौकशीची मागणी करत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मुलाने केलेल्या विषबाधाच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.