अतीक अहमद आणि अशरफ अहमद या दोघांचीही हत्या करण्यात आली. त्यानंतर या दोघांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशात आता या प्रकरणात गँगस्टर सुंदर भाटीचं नाव समोर आलं आहे. या सुंदर भाटीचं अतिक आणि अशरफ हत्याकांडाशी नेमकं काय कनेक्शन आहे? आपण जाणून घेऊ. या दोघांची हत्या झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. यातल्या मुख्य आरोपीचं नाव सनी सिंह आहे. सनी सिंह हा भाटी गँगशी जोडला गेला आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला मुख्य आरोपी सनी सिंह हा पश्चिम उत्तर प्रदेशातील गँगस्टर सुंदर भाटी गँगचा सदस्य आहे. सुंदर भाटी हा गँगस्टर सध्या सोनभद्र तुरुंगात आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे की अशरफच्या हत्येसाठी जे पिस्तुल वापरण्यात आलं ते सुंदर भाटीच्या नेटवर्कमार्फतच सनीला मिळालं. जाणून घेऊ कोण आहे हा सुंदर भाटी?
सुंदर भाटीवर ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल
पश्चिम उत्तर प्रदेशातला कुख्यात गँगस्टर अशी सुंदर भाटीची ओळख आहे. खून, खुनाचा प्रयत्न, लूट, खंडणी या संदर्भातले ६० हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मागच्या वर्षीच सुंदर भाटीला हरेंद्र प्रधानच्या हत्येच्या प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. सध्या सुंदर भाटी हा सोनभद्र जेलमध्ये जेरबंद आहे. दीड वर्षापूर्वी सुंदर भाटी हा हमीरपूर तुरुंगात होता. या हमीरपूर तुरुंगातच सनी सिंहची आणि सुंदर भाटीची भेट झाली. हळूहळू सनी सिंह हा सुंदर भाटीच्या जवळच्या लोकांपैकी एक झाला.
सनी सिंहकडे विदेशी बनावटीचं पिस्तुल
काही कालावधीनंतर सुंदर भाटीला सोनभद्र तुरुंगात ठेवण्यात आलं. सनी सिंह तुरुंगातून सुटून बाहेर आळा. यानंतर सनी सिंह हा भाटी गँगमध्ये सामील झाला. सुंदर भाटी गँगकडे एके ४७ सह अनेक जीवघेणी हत्यारं आहेत. पंजाबच्या काही तस्करांशी या गँगचं कनेक्शन आहे. जेव्हा अतिक अहमद आणि अशरफ या दोघांची हत्या झाली तेव्हा त्यांना ठार मारणाऱ्यांपैकी एक सनी सिंह होता. त्याच्याकडे जे पिस्तुल सापडलं ते सुंदर भाटीच्या नेटवर्कमधून आलं होतं असा अंदाज वर्तवला जातो आहे. हे पिस्तुल विदेशी बनावटीचं आहे.
ज्या पिस्तुलाने अतिक आणि अशरफ या दोघांना ठार करण्यात आलं ते पिस्तुल महागडं आणि विदेशी बनावटीचं आहे. सनी सिंहकडे हे पिस्तुल आलं कुठून याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसंच भाटी गँगच्या नेटवर्क मार्फत हे पिस्तुल आलं आहे हे देखील पोलीस शोधत आहेत. सनी सिंह आणि लवलेश तिवारी यांच्यासारख्या किरकोळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांकडे विदेशी बनावटीचं महागडं पिस्तुल कुठून आलं? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे त्या प्रकरणी या दोघांची चौकशीही सुरु आहे. आज तकने या संदर्भातलंं वृत्त दिलं आहे.