दिल्लीतील तिहार कारागृहात मंगळवारी (२ मे) गुंड टिल्लू ताजपुरियाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ताजपुरिया याच्यावर चार जणांनी धारदार शस्त्राने जवळपास ९० वेळा वार करून निर्घृण हत्या केली. हत्येचा भयावह व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
कुख्यात गुंड जितेंद्र गोगी टोळीच्या चार कथित सदस्यांनी मंगळवारी सकाळी टिल्लू ताजपुरिया याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. योगेश टुंडा, दीपक तितर, राजेश आणि रियाझ खान अशी आरोपींची नावं आहेत. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये रोहिणी कोर्टात गोळीबार झाला होता. या गोळीबारात कुख्यात गँगस्टर जितेंद्र गोगीची हत्या करण्यात आली होती. मृत टिल्लू ताजपुरिया हा याच हत्याकांडातील आरोपी होता.
मंगळवारी तिहार तुरुंगात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या कशी झाली, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. गँगस्टर जितेंद्र गोगीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याच्या टोळीतील सदस्यांनी ताजपुरियाची तिहार तुरुंगात हत्या केल्याची माहिती समजत आहे.
संबंधित चार आरोपींना तिहारमधील मध्यवर्ती कारागृह क्रमांक आठमध्ये पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आलं होतं. तर मृत टिल्लू ताजपुरिया याला तळमजल्यावर ठेवण्यात आलं होतं. घटनेच्या दिवशी चार आरोपींनी पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर येण्यासाठी बेडशीटचा वापर केला. यानंतर आरोपींनी गुंड टिल्लू ताजपुरियाचा पाठलाग करत त्याला तीक्ष्ण हत्याराने सुमारे ९० वेळा भोसकलं. यावेळी अन्य एका कैद्याने टिल्लू ताजपुरियाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवताच तो परत फिरला. या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.