मुंबईसह देशभरत गणेशोत्सवाची धामधूम मोठ्या उत्साहात सुरू आहे. उद्या रविवारी आपले लाडके बाप्पा आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहेत. सगळीकडे गणपती विसर्जनाची तयारी जोरात सुरू आहे. गणपती उत्सवांमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. इंदौर येथील एका गणपतीच्या गळ्यातील पैशांच्या नोटांचा हार एका भुरट्या चोराने चोरला आहे. हार चोरताना हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंदौरमधील जयरामपूर कॉलनीच्या गणेश मंडपामध्ये एका भुरट्या चोराने डल्ला मारला आहे. गणपतीच्या गळ्यात असलेला ५१ हजार रूपये किंमतीचा नोटांचा हार चोरट्याने चोरला आहे. लालबागच्या राजाची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयरामपूर कॉलनीत सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाद्वारे गणेश उत्सवाचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या मंडपामध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. एक भुरटा चोरटा मंडपात आला आणि ५१ हजार रूपये किंमतीच्या नोटाचा हार चोरला. चोराची ही घटना मंडपात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मंडळाच्या आयोजकांनी सीसीटीव्हीच्या आधारावर चोराची ओळख पटवली आहे. मंडळाने पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

दरम्यान, उद्या देशभर ११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. घरगुती तसेच मंडळांनी याची पुर्ण तयारी केली आहे. गणपती विसर्जनाला पाऊस हजेरी लावण्याची चिन्हे आहेत.