नवी दिल्ली : ब्रिटनमधील लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आणि पत्रकार गॅरी लिनेकर पुन्हा एकदा ‘मॅच ऑफ द डे’ हा बीबीसीवरील आपला कार्यक्रम सुरू करणार आहेत. गॅरी लिनेकर यांनी ब्रिटन सरकारच्या स्थलांतर धोरणाविरोधात केलेल्या ट्विटनंतर बीबीसीने त्यांना काम थांबवण्यास सांगितले होते. मात्र, त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर बीबीसीने माफी मागितली आणि लिनेकर यांना पुन्हा एकदा कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केले.
याबरोबरच बीबीसीेने आपल्या समाजमाध्यमांच्या वापराविषयी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याचेही जाहीर केले. गॅरी लिनेकर यांना कार्यक्रम थांबवायला सांगितल्यानंतर त्यांना पािठबा देण्यासाठी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आपले कार्यक्रम सादर करण्यास नकार दिला होता. बीबीसीचे कर्मचारी, निर्माते, सादरकर्ते आणि सर्वात महत्त्वाचे प्रेक्षक या सर्वासाठीच हा कठीण काळ होता असे बीबीसीचे महासंचालक टीम डेव्ही यांनी म्हटले आहे. त्याबरोबरच त्यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफीदेखील मागितली. बीबीसीेने २०२० मध्ये समाजमाध्यमांच्या वापराविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे याची जाणीव झाल्याचे डेव्ही म्हणाले.