दर वर्षांला सहा स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर अनुदानित दरात देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसकडे ग्राहकांचा ओढा वाढत असतानाच अनुदानित गॅसवरील र्निबध पाइप गॅसलाही लागू असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच येत्या मार्च अखेपर्यंत केवळ तीन सिलिंडर किंवा तीन सिलिंडरच्या वजनाइतक्याच पाइप गॅसचा पुरवठा सवलतीच्या दरात केला जाईल, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री एस. जयपाल रेड्डी म्हणाले.
दर वर्षांला केवळ सहा सिलिंडर अनुदानित दरात देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चालू आर्थिक वर्षांत अनेक ग्राहकांनी सहापेक्षा जास्त सिलिंडर वापरले आहेत. त्यांना आता स्वस्त दरात सिलिंडर मिळणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र चालू आर्थिक वर्षांच्या मध्यापर्यंत ग्राहकांनी कितीही सिलिंडर वापरले असले तरी येत्या मार्च अखेपर्यंत त्यांना तीन सिलिंडर स्वस्त दरात मिळतील, असे रेड्डी यांनी स्पष्ट केले. सिलिंडरप्रमाणेच पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅसपुरवठा होत असलेल्या कुटुंबांना मार्च अखेपर्यंत १४.२ किलो वजनाच्या तीन सिलिंडरच्या प्रमाणातच गॅसपुरवठा सवलतीच्या दरात केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले.
ज्या गृहनिर्माण सोसायटय़ांनी एकत्रितपणे गॅसचे कनेक्शन घेतले असेल, तेथील कुटुंबांना मार्चपर्यंत त्यांनी वापरलेल्या गॅसच्या प्रमाणात पुरवठा केला जाईल. मात्र, ते प्रमाण तीन सिलिंडरच्या प्रमाणापेक्षा जास्त नसेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Story img Loader