उत्तराखंड आणि गुजरातमधील गॅस प्रकल्पातील अनियमिततेवरून काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी राज्यसभेत गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

सभागृहातील गोंधळाच्या वातावरणामुळे अत्यंत महत्त्वाचे वित्त आणि विनियोजन विधेयक बुधवापर्यंत पुढे ढकलावे लागले. सोमवारी सभागृहात गोंधळ झाला होता, मात्र मंगळवारी दुपारच्या सत्रापर्यंतचे कामकाज सुरळीत पार पडले.

मात्र दुपारनंतर गोंधळाला सुरुवात झाली. सरकारने उत्तराखंड अर्थसंकल्प विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला, ही घटनात्मक गरज असल्याचे सरकारने सांगितले तेव्हा काँग्रेसच्या सदस्यांनी त्याला विरोध केला.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच उत्तराखंड विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान झाले होते, त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

उत्तराखंड विधानसभेत अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असल्याने त्याची जबाबदारी या सभागृहाची नाही, असा मुद्दा आनंद शर्मा यांनी मांडला. ही सरकारची मानसिक आणि नैतिक दिवाळखोरी आहे, असे शर्मा म्हणाले.

उत्तराखंडच्या अर्थसंकल्पावरून युक्तिवाद सुरू असतानाच काँग्रेसचे जयराम रमेश यांनी, गुजरात राज्य ऊर्जा महामंडळाबाबत कॅगच्या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात गोंधळाचे वातावरण सुरू असल्याने कुरियन यांनी दुपारी तीन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.

मात्र त्यानंतरही सभागृहात काँग्रेस आणि इतर पक्षांतील खासदारांचा गोंधळ सुरूच होता. त्यानंतर उपसभापती पी. जे. कुरियन यांनी सभागृहाचे दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचे जाहीर केले.

Story img Loader