निम्न उच्च वेगवान गाडय़ांचा जमाना भारतात सुरू झाला असून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी दिल्ली-आग्रा दरम्यान १०० मिनिटांत २०० कि.मी. अंतर कापणाऱ्या गतिमान एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीत रेल्वेसुंदऱ्यांनी प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या गाडीचा वेग कमाल १६० कि.मी आहे. निझामउद्दीन स्थानकावरून ही गाडी सनईच्या सुरावटीत पहिल्या प्रवासाला निघाली. प्रभू यांनी सांगितले की, पहिली निम्न उच्चगती गाडी सुरू करताना आनंदच होत आहे. साधारण व एक्सप्रेस गाडय़ांचा वेग रफ्तार योजनेत वाढवण्याचा विचार आहे, पण ते सोपे काम नाही.
गतिमान एक्सप्रेस शाही निळ व राखाडी रंगाची असून मध्ये पिवळा पट्टा आहे. या गाडीत भारतीय व काँटिनेंटल अन्नाची व्यवस्था केलेली आहे. ५५०० अश्वशक्तीचे इंजिन या गाडीला असून त्यात दोन एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कार, आठ एसी चेअर कार डबे आहेत. या गाडीला उच्च शक्ती आपत्कालीन ब्रेक प्रणाली आहे.
आगीची सूचना, जीपीएस आधारित प्रवासी माहिती सेवा, डब्यांना सरकते दरवाजे, डब्यांमध्ये जैव स्वच्छतागृहे, मोठय़ा खिडक्या, मोफत बहुमाध्यम सेवा (मल्टीमीडिया) या सुविधा आहेत. त्यात बातम्या, चित्रपट व कार्टून पाहण्याची सोय आहे. आग्रा लगतच्या पर्यटनस्थळांची छायाचित्रे डब्यांना सुशोभित करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुखावह होणार आहे.