Gauri Khedkar : महाराष्ट्रातील पालघर या ठिकाणी राहणाऱ्या गौरी खेडकरचा मृतदेह बॅगेत भरलेल्या अवस्थेत बंगळुरु या ठिकाणी आढळून आला. या विवाहितेचं नाव गौरी खेडकर असं आहे. गौरी खेडकरच्या पतीने घरमालकाला फोन करुन गौरीचा मृतदेह फ्लॅटमध्ये आहे ही माहिती दिली. त्यानंतर बंगळुरु पोलिसांना घर मालकाने हा प्रकार कळवला.
पोलिसांनी या घटनेबाबत काय माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं नाव गौरी अनिल सांब्रेकर आहे. लग्नानंतर तिचं नाव गौरी खेडकर असं झालं आहे. या प्रकरणात मुख्य संशयित गौरीचा नवरा राजेंद्र खेडकर आहे. राजेंद्र खेडकर हा मुंबईतील जोगेश्वरीचा रहिवासी आहे. प्रथमदर्शनी पाहता गौरीची हत्या लग्नसंबंधातील वादांतून, रोज उडणाऱ्यांना खटक्यांमधून झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
राकेश खेडकरवर पुण्यात उपचार सुरु
राकेश खेडकर याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गौरीच्या मृत्यूबाबत समजल्यानंतर तिचे माहेरचे लोक इथे आले त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. पत्नी आणि पत्नी यांच्यातल्या विसंवादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आम्हाला वाटतो आहे असं बंगळुरु पोलिसांनी सांगितलं. गौरी तिचा पती राकेश राजेंद्र खेडेकरबरोबर हुलीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोड्डाकम्मनहल्ली परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होती. राकेश एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या दोघांचे आपसांतले संबंध कसे होते याबाबत आता पोलीस माहिती घेत आहेत.
महाराष्ट्र पोलिसांनी काय सांगितलं?
गौरी खेडकर हत्या प्रकरणाबाबत महाराष्ट्र पोलिसांनी हे म्हटलं आहे की गौरी खेडकरची हत्या करुन तिचा पती बंगळुरुहून मुंबईला कारने आला. त्यानंतर त्याने मुंबईहून सातारा येथील शिरवळ गाठलं. तिथे विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री ८.३० च्या दरम्यान तो शिरवळ या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडला. सातारा पोलिसांनी त्याला पुण्याला आणलं. सध्या राकेश खेडकरवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राकेश खेडकरला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला आम्ही आमच्या कस्टडीत घेऊ असं पोलिसांनी म्हटलं आहे. गौरी खेडकर ही मूळची महाराष्ट्रातील पालघरची आहे. तिचा मृतदेह आम्हाला सूटकेसमध्ये आढळून आला अशी माहिती बंगळुरुच्या पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी दिली. गौरी आणि राकेश या दोघांचं लग्न दोन वर्षांपूर्वी झालं होतं. बंगळुरु या ठिकाणी ते फेब्रुवारी २०२५ मध्ये गेले होते.