कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांना त्यांच्या मृत्यूनंतर जगातील मानाचा समजला जाणारा अॅना पोलित्स्काया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील महिन्यात ५ सप्टेंबरला गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. शोध पत्रकारितेमधील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. अॅना पोलित्स्काया या एक निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार मिळवणाऱ्या गौरी लंकेश या पहिल्याच भारतीय पत्रकार ठरल्या आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने यासंदर्भातले वृत्त दिले.

जे पत्रकार लढतात, भूमिका मांडतात त्यावर ठाम राहतात आणि निर्भीड लेखन करतात, त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया गौरी लंकेश यांची बहिण कविता यांनी थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनशी बोलताना दिली. तसेच गौरी लंकेशना मिळालेला पुरस्कार फक्त कुटुंबाचा नाही तर जे लोक गौरी लंकेश यांच्या बाजूने उभे राहिले त्या सगळ्यांचा आहे, असेही कविता यांनी म्हटले आहे.

गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या. तसेच विविध वर्तमानपत्रांमध्येही त्या स्तंभलेखनही करत. त्यांच्या हत्येची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबाने केली. गौरी लंकेश यांची हत्या ज्या पद्धतीने झाली ते अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र त्यांचे मारेकरी पकडले जातील आणि त्यांना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा गौरी लंकेश यांच्या कुटुंबाने व्यक्त केली.

गौरी लंकेश यांना हा पुरस्कार का देण्यात आला?
अॅना पोलित्स्काया या रशियन शोध पत्रकार होत्या. तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. रशियातील भ्रष्टाचार आणि जनतेवर होणारे अन्याय यांना त्यांनी वाचा फोडली होती. वयाच्या ४८ व्या वर्षी अॅना पोलित्स्काया यांची मॉस्कोमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पत्रकारितेची आणि सामाजिक कार्याची जाणीव म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्यात येतो. भारतातील पत्रकारला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Story img Loader