Gauri Lankesh Murder Accused Bail: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असणाऱ्या दोन आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली. मात्र, सुटकेनंतर बंगळुरूमध्ये त्यांचं हारतुऱ्यांनी जंगी स्वागत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बंगळुरू न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी दोघा आरोपींचं हार घालून व भगवी शाल देऊन स्वागत केलं. तसेच, त्यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात डांबण्यात आलं होतं, असा दावाही करण्यात आला. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

९ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील दोन आरोपी परशुराम वाघमोरे व मनोहर यदावे यांना बंगळुरू सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघे तुरुंगात आहेत. ९ ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांची सुटका मात्र बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा तुरुंगातून ११ ऑक्टोबर रोजी झाली.

गावी परतताच जंगी स्वागत

दरम्यान, हे दोघे आरोपी त्यांच्या गावी विजयपुरामध्ये पोहोचल्यानंतर काही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांनी फुलांचे हार, भगवी शाल आणि विजयी घोषणा देत स्वागत केलं. या दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आलं. तिथे या दोघांनी पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर त्यांनी गावातल्या कालिका माता मंदिरात जाऊन प्रार्थनाही केली.

परशुराम वाघमोरे व मनोहर यदावे या दोघांसह अमोल काळे, राजेश डी. बंगेरा, वसुदेव सूर्यवंशी, ऋषिकेश देवडेकर, गणेश मिस्किन आणि अमित रामचंद्र बड्डी अशा एकीण १८ आरोपींनादेखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. परशुराम वाघमोरे व मनोहर यदावे या दोघांना अन्याय्य पद्धतीने सहा वर्षं तरुंगात डांबलं होतं, असा दावाही त्यांचा सत्कार करणाऱ्यांनी केला आहे.

गौरी लंकेश…लढवय्यी पत्रकार!

गौरी लंकेश यांची हत्या

५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात त्यांनी सातत्याने परखड भूमिका मांडली होती. तसेच, डाव्या विचारसरणीमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावाही केला गेला. तीन अज्ञात व्यक्ती मोटरसायकवरून आल्या व त्यांनी गौरी लंकेश यांना गोळ्या झाडल्या. यात गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर खटला वेगाने चालवण्यासाठी विशेष कोर्ट स्थावन करण्याची घोषणा केली होती.