ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण? कोणत्या कारणांवरून त्यांची हत्या झाली, याचा तपास सुरू असतानाच बंगळुरू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे. संशयिताची चौकशी सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

गौरी लंकेश यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि कलबुर्गीनंतर लंकेश यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरू पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. लंकेश यांच्या हत्येच्या घटनेनंतर त्यानं सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. संदीप असं या तरुणाचं नाव असून त्याचा आणि हल्लेखोरांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

लंकेश यांची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी बंगळुरू पोलिसांनी कंबर कसली आहे. लंकेश यांचे निवासस्थान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घरातही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, पासवर्ड असल्याने पोलिसांना अद्याप सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाहीत. तज्ज्ञांच्या मदतीने फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लंकेश आपल्या कारमधून उतरल्यानंतर घराचा दरवाजा उघडत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असाव्यात. या हत्येच्या घटनेनंतर बंगळुरू पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके स्थापन केली आहेत. लंकेश यांच्या घरी तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांची तीन पथके तपास करत आहेत. हल्लेखोर किती होते, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तीन हल्लेखोर असावेत, असा शेजाऱ्यांचा अंदाज आहे. लंकेश यांच्या डोक्यात तीन गोळ्या झाडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे.

Story img Loader