गौरी लंकेश यांची हत्या धर्माच्या रक्षणासाठी केल्याची कबुली परशुराम वाघमारे या आरोपीने कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) दिली आहे. ‘मे २०१७ मध्ये मला सांगण्यात आले की धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे. मीदेखील त्यासाठी तयार झालो. ज्याला मारायचे आहे, त्या व्यक्तीविषयी मला काहीच माहिती नव्हती, असा कबुलीजबाब त्याने दिला आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी परशुराम वाघमारे या आरोपीला कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. परशुराम वाघमारेची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीत त्याने गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ‘मे २०१७ मध्ये मला सांगण्यात आले की धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे. मीदेखील त्यासाठी तयार झालो. मात्र, आता मला असे वाटते की मी एका महिलेची हत्या करायला नको होती’, असे परशुरामने पोलिसांना सांगितले.

गौरी लंकेश यांची गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी हत्या झाली. हत्येचा घटनाक्रमही परशुराम वाघमारेने पोलिसांना सांगितला. ‘३ सप्टेंबर रोजी मला बेंगळुरुत नेण्यात आले. या अगोदर मला बेळगावात एअरगनद्वारे प्रशिक्षण देण्यात आले होते’, असे परशुरामने पोलिसांना सांगितले. हत्येच्या अगोदर तीन वेळा तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी दुचाकीवरुन गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेले होते, असेही परशुरामने कबूल केले. मात्र, ते तीन जण कोण होते, हे त्याने सांगितले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

गौरी लंकेश यांची हत्या कशी झाली; जाणून घ्या आरोपीने ‘SIT’ला सांगितलेला घटनाक्रम

दरम्यान, गौरी लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप सापडलेले नाही. मात्र, या तिघांचीही हत्या एकाच शस्त्राने करण्यात आली. या तिघांनाही लागलेल्या गोळ्यांवर एकसारख्या खुणा झाल्या आहेत. त्यावरून एसआयटीने हा निष्कर्ष काढला आहे.

Story img Loader