पत्रकार आणि विवेकवादी विचारांच्या कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची २०१७ मध्ये हत्या करण्यात आली. ५ सप्टेंबर २०१७ या दिवशी एका हिंदुत्ववादी गटाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात आत्तापर्यंत १७ आरोपींना अटक झाली आहे. त्यातला एक आरोपी मोहन नायक याला कर्नाटक उच्च न्यायालयाने ७ डिसेंबर २०२३ या दिवशी जामीन मंजूर केला. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात गौर लंकेश यांची लहान बहीण कविता लंकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कविता लंकेश यांच्यासह एसआयटी अर्थात विशेष तपास समितीनेही या जामिनाच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कविता लंकेश या प्रतिथयश फिल्ममेकर आहेत. त्यांनी १५ डिसेंबर २०२३ या दिवशी याचिका दाखल केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मोहन नायकला जामीन कसा मंजूर केला? असा प्रश्नही याचिकेत विचारण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
आरोपी मोहन नायक हा सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्याने डिसेंबरच्या आधी ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्या फेटाळण्यात आल्या होत्या. मात्र डिसेंबरमध्ये त्याची याचिका मंजूर करण्यात आली. आता या प्रकरणी कविता लंकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
गौरी लंकेश यांची २०१७ मध्ये हत्या
पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या करण्यात आली. त्यांना बंगळुरुतल्या त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. त्यांच्या छातीवर आणि डोक्यावर गोल्या लागल्या होत्या. हा हल्ला इतका भयानक होता की गौरी लंकेश यांचा जागीच मृत्यू झाला. गौरी लंकेश यांच्या हत्येचे पडसाद देशभरात उमटले होते. गौरी लंकेश या विवेकवादी विचारसरणीच्या होत्या. त्यांच्या हत्येनंतर पत्रकार आणि बुद्धिजिवींनी शांततेच्या मार्गाने रोष व्यक्त केला होता. तसंच दिल्लीच्या प्रेस क्लब या ठिकाणी आणि जंतर-मंतर मध्ये शांततापूर्ण धरणे आंदोलन केलं होतं.