पत्रकार गौरी लंकेश यांची क्रूरपणे हत्या करून त्यांना ठार करणारे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या ५ सप्टेंबरच्या रात्री करण्यात आली. त्यानंतर लवकरात लवकर मारेकरी पकडले जातील अशी घोषणा कर्नाटक सरकारतर्फे करण्यात आली. मात्र या धक्कादायक घटनेला तीन दिवस उलटूनही गौरी लंकेश यांचे मारेकरी मोकाटच आहेत.

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबाबत माहिती किंवा पुरावे सादर करणाऱ्याला १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. तरीही या प्रकरणी पोलिसांना कोणतेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी ७ संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. मात्र मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

गौरी लंकेश यांना ठार केले त्यावेळेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरूमध्ये असलेल्या गांधीनगर भागात गौरी लंकेश यांचे घर आहे याच ठिकाणी ५ सप्टेंबरला त्यांना ठार करण्यात आले. तसेच गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. सोशल मीडियावर गौरी लंकेश यांच्या हत्येच्या सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ पाठवले जात आहेत, त्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळले ?

पोलिसांनी गौरी लंकेश यांच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यानुसार, गौरी लंकेश या मंगळवारी रात्री ८ वाजून ९ मिनिटांनी त्यांच्या घरी आल्या. (सीसीटीव्हीमध्ये रात्री ८ वाजून ९ मिनिटांची वेळ दाखवत असली तरीही प्रत्यक्षात ८ वाजून २६ मिनिटे झाली होती. सीसीटीव्हीत तांत्रिक बिघाड होता असे पोलिसांनी म्हटले आहे. )

गौरी लंकेश या कारने आपल्या घरी आल्या होत्या, इमारतीच्या गेटबाहेर त्यांनी कार पार्क केली. हेडलाइट बंद केले आणि दोन मिनिटे त्या बसून राहिल्या (गौरी लंकेश दोन मिनिटे कारमध्येच का बसून राहिल्या याचे कारण समजले नाही असे पोलिसांनी म्हटले आहे)

त्यानंतर गौरी लंकेश कारमधून खाली उतरल्या. त्यांनी इमारतीचे गेट उघडले आणि घराच्या दिशेने जाऊ लागल्या.

यानंतर लगेचच गौरी लंकेश यांच्या कारवर एका बाईकच्या हेडलाइटचा प्रकाश पडला, ही बाईक मारेकऱ्याची होती. त्याने त्याची बाईक गौरी लंकेश यांच्या कारच्या बरोबर मागे थांबवली. गौरी लंकेश यांच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा आहे याची माहिती मारेकऱ्याला बहुदा होती. खबरदारी म्हणूनच त्याने बाईक अशा पद्धतीने लावली असावी असे पोलिसांनी म्हटले आहे.

त्यानंतर मारेकरी गौरी लंकेश यांच्या दिशेने गेला, कदाचित त्यांनी गौरी लंकेश यांना हाक मारली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गौरी लंकेश मागे वळल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता मारेकऱ्याने त्यांच्यावर आधी ३ आणि नंतर ३ अशा एकूण ६ गोळ्या झाडल्या.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गौरी लंकेश यांचा तोल गेला आणि त्या मागे जाऊन कोसळल्या.

गौरी लंकेश कोसळल्यानंतर मारेकऱ्याने त्यांच्या छातीवर आणखी एक गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या हृदयात गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मारेकऱ्याने त्याच्या पुढच्या बाजूने सॅक अडकवली होती आणि हेल्मेट काढले नव्हते. गौरी लंकेश कोसळल्यानंतर अवघ्या ३० सेकंदात मारेकरी तिथून फरार झाला. एकाच मारेकऱ्याने गौरी लंकेश यांना ठार केले. तीन मारेकरी आले नव्हते याबाबत आम्हाला खात्री असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो मारेकरी दिसतो आहे त्याचे रेखाचित्र तयार करणे कठीण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

या मारेकऱ्याला गांधीनगर भागातील कोणी दुकानदाराने किंवा स्थानिक माणसाने पाहिले होते का? याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातो आहे. या हत्येसाठी जी बंदुक वापरण्यात आली त्याचा फॉरेन्सिक अहवाल येण्याची वाट आम्ही बघतो आहोत असेही पोलिसांनी म्हटले आहे. लवकरच आम्ही मारेकऱ्याला शोधून काढू असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही.