देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट असलेले मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे विदेशी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. बँक ऑफ बडोदानं भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या विदेशी कर्जाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे असं म्हटलं आहे की, भारतीय कंपन्यांनी घेतलेल्या एकूण विदेशी कर्जात अंबानी आणि अदानी यांच्या कंपन्यांचा वाटा २० टक्के इतका आहे.
अहवालात पुढे म्हटलं आहे की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी विदेशी कर्जदारांकडून ३८.२ बिलियन डॉलरचं (भारतीय चलनात २.९ लाख कोटी रुपये) कर्ज घेतलं आहे. यामध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समूहाने आणि गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांनी ८.२५ बिलियन डॉलरचं (भारतीय चलनात ६३ हजार कोटी) कर्ज घेतलं आहे.
भारतीय कंपन्या आपली भांडवलासंबंधित गरज पूर्ण करण्यासाठी एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग्स (ECB) कडून विदेशी कर्ज घेतात. हा कर्ज पुरवठा युरोप, जपान आणि यूएस सारख्या देशांकडून केला जातो. भारतीय बँकांच्या तुलनेत हे कर्ज अधिक स्वस्त असते. कारण विकसित देशांचे व्याजदर विकसनशील देशांपेक्षा कमी आहेत.
अहवालात म्हटलं आहे की, गेल्या ८ वर्षांत भारतीय कंपन्यांनी २६० बिलियन डॉलरचं विदेशी कर्ज घेतलं आहे. हे कर्ज परदेशी भांडवली बाजार, व्यावसायिक बँका आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांकडून घेतलं आहे. अदानी समूहाचे गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची संपत्ती १९० अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. दोघांच्या सर्व कंपन्यांचं एकूण बाजारी भांडवल एकत्रित केलं तर ते ३३ लाख कोटी रुपयांपेक्षा (429 बिलियन डॉलर) अधिक आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १०२ बिलियन डॉलर इतकी असून ते जगातील ७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९३ बिलियन डॉलर एवढी असून ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत.