Gautam Adani on son Jeet Adani Diva Jaimin marriage : उद्योगपती गौतम अदाणी यांचा मुलगा जीत अदाणी याचे काही दिवसात दिवा जैमीन शाह हिच्याशी लग्न होणार आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. महाकुंभ मेळा २०२५ निमित्त उत्तर प्रदेशमधील प्रयागराजला आलेल्या गौतम अदाणी यांनीच याबद्दल माहिती दिली आहे. गौतम अदानी आणि प्रीती अदाणी यांना करण अदाणी आणि जीत अदाणी अशी दोन मुले आहेत. ज्यापैकी जीत अदानी आणि दिवा जैमीन शाह यांचा छोटेखानी कार्यक्रमात १२ मार्च २०२३ रोजी साखरपुडा पार पडला होता.

२०२४ मध्ये अंबानी कुटुंबात झालेल्या लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. अनंत अंबानी यांच्या कितीतरी दिवस चाललेल्या लग्न सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा २०२५ मध्ये भारतात भव्य दिव्य विवाहसोहळा होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान अंबानींप्रमाणे आता अदाणींच्या मुलाच्या लग्नात देखील मोठा थाटमाट आणि जगभरातील सेलिब्रिटी पाहायला मिळणार यासाठी सर्वजण उत्सुक असतानाच गौतम अदाणी यांनी या लग्नाबद्दल माहिती दिली आहे. गौतम अदाणी यांनी त्यांच्या मुलाचं लग्न हे पारंपरिक आणि अत्यंत साध्य पद्धतीने केलं जाणार असल्याचे म्हटले आहे.

गौतम अदाणी नेमकं काय म्हणाले?

प्रयागराज येथे गौतम अदाणी यांना लग्नाच्या तयारीबद्दल माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना गौतम अदाणी म्हणाले की, “जीतचं लग्न ७ फेब्रुवारी रोजी आहे. खरंतर आमची कामाची पद्धती ही एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. माता गंगेचे आशीर्वाद घेण्यासाठी जीतही येथे आला होता. जीतचं लग्न हे खूप पारंपारिक आणि साध्या पद्धतीने होणार आहे”.

हे लग्न सेलिब्रेटींचे महाकुंभ होणार आहे का? असा प्रश्न गौतम अदाणी यांना विचारण्यात आला, ज्याला उत्तर देताना गौतम अदाणी म्हणाले की, “असं कदापि होणार नाही. खूप पारंपरिक पद्धतीने कुटुंबातच लग्नसोहळा होणार आहे”.

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेस येथे जीत अदाणी यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जीत यांनी ग्रुप सीएफओच्या कार्यालयात काम करण्यास सुरुवात केली. ते सध्या ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी २०१९ मध्ये अदानी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरूवात केली होती.

Story img Loader