Gautam Adani Fraud Bribery Case for Solar Energy Contract: अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला आहे. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदाणी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदाणी समूहाकडून उत्तर दिले गेले नाही. याआधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने आरोप केले होते, अदाणी समूहाने त्यावेळी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट, यूएस ॲटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. यूएस अतिरिक्त सहायक ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले, “भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.”

अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी असेही म्हटले की, अदाणी आणि अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी आणि माजी सीईओ विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला आणि ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले. गौतम अदाणी यांच्याशिवाय या आरोपात सहा लोकांची नावे आहेत. अदाणी ग्रीन एनर्जी लि. चे सीईओ विनीत जैन, रंजीत गुप्ता, रुपेश अग्रवाल, सिरिल कॅबनेस, सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा यांच्या नावाचा समावेश आहे.

गौतम अदाणी यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपानुसार, या प्रकरणात सामील असलेल्या षडयंत्रकर्त्यांनी गौतम अदाणी यांना न्युमेरो युनो आणि द बिग मॅन या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याची प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदाणी यांनी आपला मोबाइल फोन वापरला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gautam adani charged in us for bribes worth 265 million dollar to indian govt officials fraud kvg